सखेसोबतीं

801

योगेश नगरदेवळेकर, [email protected]

हरणालाही विठूरायाची ओढ

या वर्षीच्या वारीत तर चक्क एक हरीण सामील झालं आहे. खामगाव तालुक्यातील अटाळी येथून निघालेल्या वारीमध्ये हे हरीण आहे. खरं तर हरीण हा लाजराबुजरा, सहसा माणसांपासून दूर राहणारा प्राणी मानला जातो. तरी माणसाच्या संगतीत टाळ-मृदुंगाच्या साथीने हे हरीण वारकऱयांबरोबर निघाले आहे.

मानवाला पूर्वापार हरीण माहीत होते याचे दाखले मिळतात. रामायणातील सोन्याचे हरीण तर सर्वज्ञात आहे. मृगया म्हणजे शिकार हा शब्दच हरीणाची शिकार यातून आलेला आहे.

आपण सगळय़ांना हरीण असं म्हणतो, पण त्यात महत्त्वाचे दोन प्रकार आहेत. सारंग आणि कुरंग अनुक्रमे डीअर आणि ऑण्टिलोप. दिसायला तशी सारखीच आहेत. मग फरक कशात आहे. फरक आहे तो त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा शिंगांमध्ये.

डीअर म्हणजे सारंग कुळातील हरिणांची शिंगे कायम नसतात. ती वषर्लानतर किंवा विणीच्या हंगामानंतर गळून जातात, तर कुरंग किंवा ऍण्टेलोप जातीच्या हरिणांमधील शिंगे त्यांच्या डोक्यावर कायम असतात. अगदी आपल्या गाय, बैल किंवा बकरीच्या शिंगांसारखी.

सारंग कुलातील हरिणाची शिंगे भरीव असतात. त्यांना शाखा फुटलेल्या असू शकतात. शिंगांची वाढ होत असताना त्यावर मखमली आवरण असते व त्यामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यामुळे पूर्ण वाढ होईपर्यंत नर इतरांशी संघर्ष टाळतात. पूर्ण वाढ झाल्यावर मखमली आवरण गळून पडते आणि त्याचे पोपडे पडतात किंवा नर झाडावर, दगडावर शिंगे घासून आवरण काढून टाकतात. विणीच्या हंगामात मादीला आकृष्ट करणे तसेच प्रतिस्पर्धी नराशी सामना करणे हे या शिंगाचे प्रमुख काम असते. त्यानंतर ही शिंगे गळून पडतात. या प्रकारात त्यांना इजा होत नाही. हीच गळून पडलेली शिंगे आपल्याला सांबरशिंग म्हणून मिळतात.

या सारंग कुलातील आपल्याकडे सांबर, चितळ, भेकर, पिसोरी हे प्रकार आढळतात. सांबर हे यातील आकाराने सर्वात मोठे हरीण आहे. घनदाट जंगलापासून ते शुष्क पानगळीच्या जंगलातसुद्धा त्याचा वावर आहे.

सामान्यपणे आपण सहज ज्याला हरीण म्हणतो ते म्हणजे चितळ. विटकरी रंग आणि त्यावरील पांढरे ठिपके यावरून हे हरीण सहजच ओळखू येते. जंगलामध्ये कुरणे असल्यास त्यांची संख्या वाढते. त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाघांची पण संख्या अशा जंगलात चांगलीच असते.

लहानखुरे पण भुंकण्यासारखा आवाज काढण्याच्या पद्धतीमुळे भेकर ओळखले जाते. महाराष्ट्रातील जंगलात त्यांचा बराच वावर आहे. शिंगांना १२ किंवा जास्त टोके असल्याने बारशिंगा ही जात ओळखली जाते. त्यांचा वावर कान्हा अभयारण्यात आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या