यह दोस्ती…

702

योगेश नगरदेवळेकर

आपल्या हिंदुस्थानी सणांची जागा आता हळूहळू पाश्चात्त्य सण घेऊ लागले आहेत. रक्षाबंधन कधी आहे हे छातीठोकपणे सांगता येणार नाही, पण फ्रेंडशिप डे कधी असतो हे हल्ली शाळेत जाणारं पोर पण सांगू शकतो. मैत्री हा मानवाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानवाचे आपापसातले मैत्रीबंध जटील असले तरी आपल्या निकोप वाढीसाठी आवश्यक असतात.

मानवाचा जवळचा मित्र म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जाते. प्राचीन काळापासून एकमेकांना साथ असल्याने दोघांमध्ये भावनिक बंध निर्माण झाले आहेत. कुत्र्याच्या विरहाने रडणारा माणूस किंवा कुत्र्याच्या मृत्यूनंतर दुःखी होणारा मानव त्यांच्यातील संबंध स्पष्ट करतो.

मग अशीच मैत्री इतर प्राण्यांतही आढळते का. लहानपणापासून आपण इसापनीती पंचतंत्रमधल्या गोष्टी वाचत असतो. त्यात वेगवेगळे प्राणी एकमेकांचे मित्र असतात. एका तळय़ातील पाणी आटून गेल्याने मरायला टेकलेल्या कासवाला उडत नेणारे बगळे किंवा ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ यातील माकड आणि मगरीची मैत्री अशी अनेक मित्रांच्या जोडय़ा कथेत आढळतात. पण वास्तवात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ असे प्राणी जगतात अस्तित्वात असतात का, तर त्याचं खरं उत्तर ‘नाही’ असंच येईल. म्हणजे ते एकमेकांबरोबर राहतात, मदत करतात, पण यात मैत्रीपेक्षा जगण्यासाठीची तडजोड महत्त्वाचा असते. अशा प्रकारच्या सहजीवनाला सिम्बॉयसिस असं म्हटलं जातं. साधारणपणे याचे तीन ठळक प्रकार पडतात.

१) दोघांनाही फायदेशीर, २) एकाला फायदा असतो, पण दुसऱयाला ना फायदा ना तोटा, ३) परजीवित्व किंवा बांडगूळ प्रवृत्ती.

‘एकमेका सहाय्य करू’ अशा पद्धतीने दोन वेगळे जीव एकत्रित येतात याचं उत्तम उदाहरण मगर आणि प्लवर पक्षाचे आहे. काठावर आलेल्या मगरीच्या जबडय़ात शिरून हापसी दातात अडकलेले मांसाचे तुकडे गट्टम करतो. मगरसुद्धा जबडा उघडा ठेवून हे दातसफाईचे काम त्याला करू देते. यात प्लव्हर पक्षाला अन्न मिळते आणि मगरीला दातातील अन्न सडून पुढे होणाऱया इन्फेक्शनपासून सुटका मिळते. हिंदुस्थानातील एका जातीची वानरे झाडाच्या शेंडय़ावरील कोवळा पाला तोडून खाली चरत असलेल्या हरणांना टाकतात. अर्थात हा चांगूलपणा कशासाठी असतो तर माकडं जमिनीवर वावरत असताना जर वाघ किंवा शिकारी प्राणी आला तर जमिनीवर चपळ असणारी हरणं माकडांना धोक्याचा इशारा देतात, जेणेकरून ते आपला जीव वाचवू शकतात. जंगलात आढळणाऱया पानं शिवून घरटं बनवणाऱया लाल मुंग्या अतिशय आक्रमक असतात, पण ते त्याच्या घरटय़ाच्या जवळ एका विशिष्ट पक्षाला घर बनवू देतात. याचा फायदा दोघांनाही होतो. तो पक्षी इतर संकटांपासून त्यांना वाचवतो, तर पक्ष्याच्या पिलांना या भयानक मुंग्याच्या संरक्षणामधून हात लावायची हिंमत कोणी करत नाही.

काही बाबतीत स्वजातीतील प्राणी एकमेकांना मदत करतात असे वरवर तरी दिसून येते, परंतु त्याचा मूळ उद्देश त्यांच्या जातीचा निर्वंश होऊ नये यासाठीची धडपड किंवा आदिम प्रेरणा असावी. रानकुत्रे आपल्या शिकारीतला काही हिस्सा पिलासाठी राखून ठेवतात, पण शिकार करू न शकणाऱया आपल्या गटातील प्रौढ कुत्र्यासाठी पण ठेवतात हे विशेष आहे.

पाळीव प्राण्यामध्ये मैत्री झालेली दिसून येते. उदा. एकाच घरातील कुत्रा व मांजर किंवा पक्षी, परंतु तीसुद्धा लाभलेले सुरक्षित वातावरण आणि अन्नासाठी भांडावे लागत नसल्याने होत असावी. मानवाला भावभावना व्यक्त करता येत असल्याने आपण नाती व मैत्री निर्माण करू शकतो. आपली मैत्री या निसर्गाशी आणि त्यातल्या प्राण्यांशी अखंड राहो ही या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने इच्छा.

आपली प्रतिक्रिया द्या