बेस्टचा एक लाख शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्ट उपक्रमाचा एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीने मंजूर केला. रिक्त पदे कमी करणे, आस्थापना खर्च कमी करणे, बसमार्गांमध्ये सुधारणा, लांबच्या प्रवासाचे भाडे वाढवणे अशा सुधारणांसह या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. सन २०१८-१९ चा ५४६१ कोटींचा अर्थसंकल्प आता सभागृहात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

तीन दिवस चाललेल्या या अर्थसंकल्पीय चर्चेची सुरुवात स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्या भाषणाने झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे आशीष चेंबूरकर, राजुल पटेल, संजय घाडी, सुजाता सानप, सुजाता पाटेकर, सदानंद परब, समीक्षा सक्रे यांनी आपले विचार मांडले व बेस्टला काही सूचना केल्या. विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी या चर्चेनंतर सभात्याग केला.

दोन वर्षांचे अर्थसंकल्प सभागृहात
आर्थिक तोटय़ात आलेल्या बेस्टने गेल्या वर्षी ५९० कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर केला होता, मात्र एक लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रथा असल्यामुळे पालिकेने तो अद्याप मंजूर केला नाही. त्यामुळे आता पालिका सभागृहाला या सन २०१७-१८आणि सन २०१८-१९ अशा दोन वर्षांच्या अर्थसंकल्पावर निर्णय घ्यावा लागणार आहे.

पालिकेकडून ३७७ कोटींचे अनुदान
बेस्ट प्रशासनाने अगोदर ८८०.८८ कोटी तुटीचा अर्थसंकल्प समितीसमोर ठेवला होता. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विविध कडक उपाययोजनांचा कृती आराखडा बेस्टला सादर केला होता. हा आराखडा अर्थसंकल्पाच्या आडून मांडण्यात आला होता. या आराखडय़ातील काही तरतुदी समितीने मंजूर केल्यामुळे बेस्टची तूट ५०४.१८ कोटींनी कमी झाली. आराखडय़ातील उपाययोजना केल्यानंतर जी तूट शिल्लक राहते ती आणि कामगारांच्या बोनसचा निधी असे मिळून३७६.७० कोटी पालिकेने अनुदान द्यावे अशा गृहीतकावर हा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.