
‘बेस्ट’ बसच्या कमतरतेमुळे ‘वेटिंग पीरिएड’ वाढल्याने प्रवाशांचे हाल होत असताना बेदरकारपणे गाडी चालवून ठोकरल्यामुळे एकाच वर्षात तब्बल 32 पादचाऱ्यांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरातील या 108 अपघातांत सर्वाधिक 77 अपघात हे खासगी इलेक्ट्रिक कंपन्यांच्या गाड्यांचे आहेत. त्यामुळे मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट पादचाऱ्यांसाठी ‘काळ’ बनत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत रेल्वेनंतर सर्वात जास्त म्हणजे किमान 25 ते 30 लाख प्रवासी दररोज ‘बेस्ट’च्या बसने प्रवास करतात. ‘बेस्ट’चा प्रवास सुरक्षित समजून हा प्रवास केला जातो. मात्र मार्च 2025 ते मार्च 2026 या वर्षभरात बेस्ट बसेसचे 108 अपघात झाले आहेत. यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांची संख्या केवळ 31 आहे. मात्र खासगी कंत्राटदाराकडून घेतलेल्या बस अपघातांची संख्या जास्त आहे. कधी दुभाजकाला धडक, कधी दुसरी वाहने उडवणे, तर कधी बेस्टला आग आणि कधी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे फुटपाथवरून चालणाऱ्या प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागत आहे.
प्रशासन म्हणते, आम्ही प्रशिक्षण देतो
भाडेतत्त्वावरील बसगाड्या पुरवठादार व्यावसायिक संस्था यांना बसचालकासहीत गाड्या पुरविणे अनिवार्य आहे. यानंतर या बसचालकांना दिंडोशी वाहतूक प्रशिक्षण येथे सद्यस्थितीत 21 दिवस प्रत्यक्ष गाडीवर तसेच 6 दिवस वर्गामध्ये उजळणी वर्गाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. आगारस्तरावर विभागीय वाहतूक पोलीस यांच्याकडून वाहतूक प्रशिक्षण केंद्र, दिंडोशी यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने समुपदेशन वर्गही आयोजित केले जातात.
चालकावर कारवाई अटळ
एखादा बसचालक मद्यप्राशन करून बसगाडीवर कार्यरत असल्याचा संशय आल्यास, त्याची ब्रेथ एनेलायझर टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. यामध्ये मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास निलंबनासारखी कारवाई होऊ शकते.



























































