पालिकेची विद्यार्थिनी आलिया मुल्लाची गगनभरारी! सिंगापूरनंतर आता अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड

‘बेस्ट’ कर्मचारी वसाहत, परळ येथे राहणारी आणि ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या आलिया अब्दुल रजाक मुल्ला हिची सिंगापूरनंतर आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या

व्हिटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. ‘बेस्ट’चे कर्मचारी अब्दुल रजाक मुल्ला यांची मुलगी असलेल्या आलिया हिने अभ्युदयनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिची सिंगापूर येथे 2019-20 या कालावधीत पुढील शिक्षणाकरिता निवड झाली होती.

परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीत लहानपण गेलेल्या आलिया हिला सुरुवातीपासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. तिचा हा गुण पाहून वडील अब्दुल मुल्ला यांनी सुरुवातीपासूनच तिला प्रोत्साहन दिले. ‘बेस्ट’मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी आलियाला शैक्षणिक बाबतीत कोणतीही कमतरता पडू दिली नाही. पालिकेच्या अभ्युदयनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर (दहावी 90.60 टक्के) तिची अकरावी-बारावीसाठी युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशिया या इंटरनॅशनल शिक्षणासाठी निवड झाली. या ठिकाणी दोन वर्षे शिक्षण घेत गुणवत्ता सिद्ध केल्याने आता तिची यूएसमधील व्हिटॉन युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली आहे. या ठिकाणी ती पुढील चार वर्षे लिबरल आर्ट्स डिग्री, स्पेसिलायझेशम इन सिलेक्टेड सब्जेक्टचे शिक्षण घेणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

आलिया मुल्ला हिच्या यशाबद्दल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. आलिया हिची जिद्द आणि पालिका शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच असे यश मिळत असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षण समितीकडून घेतल्या जाणाऱ्या महत्वाकांक्षी निर्णयांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेकडून सत्कार

आलिया मुल्ला हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तिच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. शिवडी विधानसभा व शाखा क्र 204 च्या वतीने पुढील चार वर्षांच्या शिक्षणाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, एकनाथ सणस, पाटणकर, राजू रावराणे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या