संप थांबवा; हायकोर्टाने आंदोलकांना खडसावले

सामना ऑनलाईन, मुंबई

 ‘आधी कामगारांचे प्रश्न सोडवा, नंतरच माघार घेऊ’ असा इशारा देत संप सुरूच ठेवणार असल्याचे आज कृती समितीने कामगारांच्या मेळाव्यात जाहीर केले. यामुळे उद्या पाचव्या दिवशीही ‘बेस्ट’चा संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून सुरू झालेला संप चौथ्या दिवशी सुरू राहिला. पालिका प्रशासनासोबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कृती समितीची चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. आज सायंकाळी कृती समितीने परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये कामगारांना एकत्र बोलावले. या बैठकीत कदाचित संप संपल्याची घोषणा होईल अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र कृती समितीने संपावर ठाम राहत उद्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतरच काय तो निर्णय घेऊ असे सांगितले. त्यामुळे उद्या सकाळी पुन्हा एकदा मुंबईकरांना हालाला सामोरे जावे लागणार आहे.

तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती

बेस्टचा संप तातडीने सुटला पाहिजे यासाठी सर्कतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास सचिव, परिवहन आयुक्तांची एक समिती बनविण्यात आली आहे. ही समिती महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे तसेच बेस्ट कर्मचारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करेल. या समितीची बैठक उद्या सकाळी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने आज बेस्ट आंदोलकांना खडसावले. चार दिवसांपासून सुरू असलेला संप थांबवा, यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घ्या. त्याकरिता स्वतःहून पुढाकार घ्या अशा शब्दांत हायकोर्टाने मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या बेस्टच्या आंदोलनकर्त्या संघटनांना ठणकावले.महापौर बंगल्यावर आज पुन्हा चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे ही बैठक झाली नाही.

शुक्रवारी सायंकाळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या दालनात उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. पण संपाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत राज्य सरकारही संभ्रमावस्थेत असल्यामुळे पाच मिनिटांत बैठक संपली. उद्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीवरच प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या