महाव्यवस्थापकांच्या आडमुठेपणामुळे ‘बेस्ट’खड्डय़ात’!

44

सामना ऑनलाईन, मुंबई

बसमध्ये तिकिटासाठी वापरल्या जाणाऱया तब्बल ६५ टक्के ‘ट्रायमॅक्स’ मशीन्स नादुरुस्त असल्यामुळे ‘बेस्ट’ला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  ‘ट्रायमॅक्स’ कंपनी अत्याधुनिक नवीन मशीन्स द्यायला तयार असताना प्रशासन त्या घेत नाही. त्यामुळे  आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’चा नुकसानीचा आकडा वाढत आहे. याला ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

बेस्टचे नुकसान वाढत असताना प्रशासन ‘ट्रायमॅक्स’कडून नव्या अत्याधुनिक मशीन्स का घेत नाही, असा सवाल शिवसेनेचे अनिल कोकीळ, सुहास सामंत यांनी केला आहे. तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सुमारे चार हजार नव्या ट्रायमॅक्स यंत्रांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता, मात्र आताचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ही यंत्रे परत पाठवून नव्याने दुसऱया कंपनीकडून तिकीट मशीन्स खरेदीचा प्रस्ताव का आणला, असा सवाल अनिल कोकीळ यांनी केला.

‘ट्रायमॅक्स’बरोबरचा करार कसा मोडणार

‘ट्रायमॅक्स’ कंपनीबरोबर तिकीट मशीन्ससाठी २०२१ पर्यंत करार केला आहे. असे असताना नव्याने दुसऱया कंपन्यांचा प्रस्ताव बेस्ट समितीत आणत आहेत. संबंधित कंपनी जर न्यायालयात गेल्यास ‘बेस्ट’चे नुकसान  वाढत जाणार असल्याचे अनिल कोकीळ यांनी सांगितले. याला सर्वस्वी महाव्यवस्थापक जबाबदार राहतील, असेही ते म्हणाले.

‘ट्रायमॅक्स’ कंपनी नवीन सॉफ्टवेअर देण्यास तयार आहे. मात्र ‘बेस्ट’ प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळेच दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे- आशीष चेंबूरकर, अध्यक्ष, ‘बेस्ट’ समिती

आपली प्रतिक्रिया द्या