पालखी सोहळ्यांचे अनोखे मॅनेजमेंट; वारकरी आणि सोहळा प्रमुखांमध्ये सुसंवाद

>> नवनाथ शिंदे

होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।
काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।।
अभिमान नुरे। कोड अवघेचि पुरे।।
तुका म्हणे डोळा। विठो बैसला सावळा।।

हिंदुस्थानातील लाखो भाविकांसह वारकऱ्यांची श्रद्धा म्हणजे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा… भल्याभल्या मॅनेजमेंट कंपन्यांच्या नियोजनालाही फिके पाडणारे वारकऱ्यांचे दिनक्रम अनोखे आहे. पालखी सोहळा कालावधीत भल्या पहाटे स्नान करून काकडा आरतीने श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो वारकऱ्यांची पावले ठरलेल्या वेळेतच नाश्ता, दुपारी जेवण करीत रात्रीचा मुक्काम गाठतात. मुखोगत अभंग, टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष करीत दररोज किमान 20 ते 25 किलोमीटरचा टप्पा अगदी लीलया पार पाडतात. या नियोजनासाठी फक्त दरदिवशी मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा प्रमुखांनी सांगितलेल्या सूचनांचे दिंडी प्रमुखांकडून तंतोतंत पालन करून मार्गक्रमण केले जाते.

जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव पालखी सोहळा जनक तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर यांनी पालखी सोहळा सुरू केला आहे. देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पुढे आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसह श्री क्षेत्र देहू- आळंदी देवाची- पंढरपूर अशी आषाढी वारीची परंपरा सुरू केली आहे. हाती ध्वज, पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात भजन गात दिंडींची परंपरा सुरू झाली आहे. कालानुरूप याचे स्वरूप बदलले असून लाखो वारकरी सहभागातून पायी वारी करण्यास प्राधान्य देत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे याच दृढ निश्चयाने वारकरी दिंडी सामील होतो. जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू गाावतून निघतो. तो दिवस ज्येष्ठ वद्य सप्तमी असतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला श्री क्षेत्र आळंदी देवाचीहून मार्गस्थ होतो.

पालखी सोहळ्याला तब्बल 800 वर्षांची परंपरा असून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीपुढे मानाचे दोन अश्व असतात. त्यापाठोपाठ 250 ते 280 दिंड्या सहभागी होतात. त्याचप्रमाणे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचीही पालखी शेकडो दिंड्यांसह मार्गक्रमण करतो. दोन्ही पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या परंपरागत असून त्यांना अनुक्रमांक दिलेला आहे. प्रत्येक दिंडीतील वीणाधारक वारकरी प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार पायी सोहळ्यात पारंपरिक अभंग, भजन गायले जाते. त्यामध्ये भारूड,गवळण भजन प्रकारांचा समावेश असतो. दररोजच्या मार्गक्रमणात दूरचे अंतर पार करावयाचे असल्याचे वारकरी पहाटे दोन वाजल्यापासून तयारी करतात. लवकर उठून, अंघोळ, देवपूजा, चहा, नाश्ता झाल्यानंतर मार्गक्रमणाला सुरुवात करतात. त्यामध्ये महिला वारकऱ्यांचाही मोठा सहभाग असतो. दिंडीतले वारकरी रोज 20 ते 25 किलोमीटरचे अंतर पार करून टप्पा पुर्ण करतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यातील गावात केला जातो. संबंधित गावकरी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी चहा नाश्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजेच विठ्ठलाची सेवा असल्याची भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे वारीतील गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव दिसूनही येत नाही.

पालखी सोहळा मार्गात आडवे आणि उभ्या रिंगणाला विशेष महत्व असते. त्यामध्ये अश्वासह मेंढ्याच्या रिंगणाचा समावेश असतो. दरम्यान, पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्याकडे भक्तीचा मार्ग म्हणून जसे पाहिले जाते. तसेच उत्तम व्यवस्थापनाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणूनहा दिंड्या एक आदर्श ठरतात. दररोज मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी उभे करण्यात येणारे तंबू, वारकऱ्यांसाठी रात्रीचे जेवण,वाढपे, पाण्याचे ट्रँकर, इतर वाहनांसह वयोवृद्ध आजारी पडणाऱ्या वारकऱ्यांना पुरविण्यात येणारी वैद्यकीय सेवा अशा सर्व गोष्टींचे बारकाईने नियोजन केले जाते. तब्बल 21 दिवस मार्गक्रमण केल्यानंतर पालखी सोहळा विनासायास पंढरीत पोहोचतो. मात्र, एवढ्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी कोणालाही बोलाविले जात नाही. सोहळा प्रमुखांसह चोपदारांच्या एका इशाऱ्यावर लाखोंचा वारकरी समाज क्षणार्धात शांत होतो.

तुका म्हणे येथे भजन प्रमाण : काय थोरपण जाळावे
श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांसह जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वर्षांनुवर्षे वारकऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. ऊन, वारा,पाऊस वातावरणातील बदल सहन करत लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात. दरम्यान, प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी सकाळचा नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळचे जेवण पुरविले जाते. परंतु, दिंडीत मर्यादेपेक्षा अधिक वारकऱ्यांची संख्या असल्यास आणि पाऊस पडल्यास वारकऱ्यांच्या जेवणाचे हाल होतात. अशा स्थितीत अनेक दिंडीमालक वारकऱ्यांची संख्या कमी कशी राहिल याकडे लक्ष देतात. दरम्यान, दिंडी सोहळ्यात थोरपणापेक्षा भजनाला अधिक प्राधान्यासाठी गायक आणि किर्तनकार अभंग, भजनाची सेवा करतात. तुका म्हणे येथे भजन प्रमाण : काय थोरपण जाळावे ते या अभंगाप्रमाणे अहंकार घालाविण्यासाठी वारकऱ्यांना स्वयंशिस्त, भजन, प्रवचनाचे महत्व पटवून दिले जाते.

माउलींच्या सोहळ्यातील केंद्रे महाराजांची दिंडी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडी सोहळ्यातील केंद्रे महाराजांची दिंडी असून सुमारे 5 हजारांवर वारकऱ्यांचा समावेश असतो. माऊलींच्या रथामागे 43 क्रमांक असलेल्या दिंडीच्या नियोजनासाठी कमिटी काम करत आहे. प्रत्येक विभाग वेगवेगळे असून त्यामध्ये पाणी व्यवस्था, जेवण, नाश्ता, तंबू कमिटी, मालवाहतूक यंत्रणेवर बारकाईने लक्ष दिले जाते. 1978 सालापासून माऊलींच्या रथामागे 40 वर्षांपासून केंद्रे महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे. वैकुंठवासी ह.भ. प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (आळंदी) यांनी दिंडीची सुरूवात केली. केंद्रे संस्थेच्यावतीने दरवर्षी 100 मुलांना मोफत वारकरी शिक्षण दिले जाते. त्यांच्या खर्चांची जबाबदारी संस्था घेते. वर्षंभरात अन्नदान, वृक्षारोपण, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान, आरोग्य शिबीर घेतले जाते.

कोरोनानंतर दोन वर्षांनी पायी वारीचा उत्सव
कोरोना संसर्गानंतर दोन वर्षांनी पायी वारी पालखी सोहळा रंगणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सोहळा प्रमुखांसह प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे. यंदा वारी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग दोन वर्ष पायी वारीला खंड पडल्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. त्यादृष्टीने दिंडी प्रमुखांनी तयारी केली असून, लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने पालख्या श्री क्षेत्र पंढरीला मार्गस्थ होणार आहेत.