शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला

17
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या वीस दिवसांपासून रखडलेला बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर आज अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला. पहिल्या टप्प्यात ३१ कर्मचाऱ्यांचा पगार आज करण्यात आला तर उद्या २२ मार्च रोजी उर्वरित ११ हजार अधिकाऱ्यांचा पगार होणार आहे. पगाराकडे डोळे लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण पसरले होते. कोणत्याही संपाशिवाय पगार झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगारच मिळाला नव्हता. महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार होत असल्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. पगार नक्की कधी होणार याबाबत काहीच माहिती पुढे येत नसल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पगारासंबंधी तोडगा काढण्यासाठी नुकतीच गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाव्यवस्थापक जगदीश पाटीलही उपस्थित होते. या बैठकीतच कामगारांना २१ व २२ मार्च रोजी पगार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. शिवसेनेच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आज ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आले. कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत यासाठी कामगार सेनेनेही महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले असून त्यावर काम सुरू असल्याची माहिती अध्यक्ष कोकीळ यांनी दिली.
दरम्यान, बेस्टच्या ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा उपक्रमाला १८५ कोटींची व्यवस्था करावी लागते. बेस्टला अनेकदा त्याकरीता कर्ज घ्यावे लागते. यावेळीही कर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र तो मंजूर झाला नाही. तो मंजूर होईपर्यंत वाट पाहत बसल्यास कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यास अजून उशीर झाला असता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी देणी थांबवली आहेत. टाटा कंपनीचे वीज बिल थकवून प्राधान्याने कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले असल्याचे समजते.
अध्यक्षांनी गाडी स्वीकारली नाही
गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या बेस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराचे सावट होते. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाहीत तोपर्यंत सत्कार व गाडी स्वीकारणार नाही, अशी घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली होती. स्वत: बेस्टचे माजी कर्मचारी असल्यामुळे कोकीळ यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी विशेष प्रयत्न केले. उद्या अधिकाऱ्यांचा पगार झाल्यानंतर अध्यक्षांसाठी असलेली प्रशासनाची गाडी परवापासून स्वीकारणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या