आजचा तरुण आणि ‘भगवद्गीता’

3396

>>समिधा चंद्रात्रे 

‘तरुण’ हा शब्द ऐकताच डोळ्यांपुढे उत्साह, जिद्द, प्रचंड सामर्थ्य, बुद्धिमत्ता, काम करण्याची क्षमता, ठरवले ते मिळविण्याची ताकद, अशा अनेक गुणांनी समृद्ध असे व्यक्तिमत्त्व उभे राहते. वेदांनीदेखील ‘नमा युवभ्यो’ असे म्हणून युवाशक्तीचे श्रेष्ठत्व प्रतिपादित केले आहे. त्यापुढे उपनिषदकारदेखील –

युवा स्यात्साधुयुवाध्यायकः
आशिष्ठाs द्रढिष्ठाs बलिष्ठः।
त्सयेयं. पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् ।

असे तरुणाचे वर्णन करतात. त्यांतही सदाचारी, सुसंस्कृत, चपळ, खंबीर, बलवान, धनधान्याने समृद्ध अशा युवानाचे वर्णन केले आहे. स्वामी विवेकानंदप्रभृती, विभूतींनीदेखील युवाशक्तीचे सामर्थ्य ओळखून राष्ट्राच्या कार्यासाठी त्याला साद घातली आहे. डॉ. अब्दुल कलामदेखील ‘Vision 2025’ देताना युवाशक्तीचीच निवड करतात!

या युवाशक्तीचा आविष्कार झाला की अलौकिक ध्येयनिष्ठ अशी व्यक्तिमत्त्वे निर्माण होतात. हिंदुस्थानात तर अगदी प्राचीन काळापासून असे अनेक युवान होऊन गेलेत. त्यांतील वानगीदाखल काही नावे घ्यायची झाल्यास मृत्यूकडे स्वतःहून निर्भयतेने जाणारा नचिकेता, वैदिक धर्म पुनर्स्थापित करणारे शंकराचार्य, मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, युगंधर श्रीकृष्ण, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. विक्रम साराभाई, डॉ. कल्पना चावला, मेजर विक्रम बत्रा ही काही नावे घेता येतील; परंतु अशी अगणित ज्ञात-अज्ञात व्यक्तिमत्त्वे आपल्या देशात होऊन गेलीत, आजही आहेत.

ही युवाशक्ती आजच्या तरुणाईतही ठासून भरली आहे. आजचा युवानही विचार करू पाहतोय. चांगल्या गोष्टी उचलू पाहतोय. त्यासाठी मेहनत आणि धडपड करण्याची तयारीही त्याच्याकडे आहे. हे सर्व असतानासुद्धा ज्या प्रमाणात ही शक्ती आविष्कृत व्हायला हवी त्या प्रमाणात ती होताना दिसत नाही. वस्तुतः हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. त्यामानाने आपल्या देशाच्या विकासाची गती कुठेतरी कमी पडते आहे असे दिसते. यामागे अनेक कारणे आहेत. आपल्या घरापासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वयात हा युवान अनेक प्रकारच्या द्वंद्वांना तोंड देतो आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो शिक्षणाचा. शिक्षणाचा नव्हे, ‘Degree’ मिळविण्याचा! ‘Degree’ नहीं होगी तो नौकरी नहीं होगी, नौकरी नही होगी तो कोई बाप अपनी बेटी नहीं देगा, Bank credit card नहीं देगी, दुनिया respect नहीं देगी’ या विवंचनेत आजही बहुतांश युवावर्ग सापडला आहे. त्यातून निर्माण होते स्पर्धा, त्यात टिकण्याची धडपड. त्यासाठी काहीही करण्याची तयारी, तरीही नाही टिकलो तर येणारे नैराश्य, त्यातून वाईट सवयी किंवा आत्महत्या! ही साखळीच जणू आजूबाजूला दिसत आहे. त्यात भ्रष्टाचार, Social Mediaमुळे निर्माण होणाऱया समस्या ही कारणेही आहेतच!

या कारणांच्या मुळांशी जाण्याचा प्रयत्न केला की डोळय़ांसमोर येतो ‘सीदन्ति मम गात्राणि।’ आणि म्हणून ‘न योत्स्ये।’ असे म्हणणारा अर्जुन! तोदेखील युवान होता, सामर्थ्यशाली होता, परंतु द्वंद्वांत अडकला होता. याचे कारण होते ते म्हणजे त्याला पडलेला ‘स्व’चा विसर; जो आजच्या बहुतांश तरुणाईला पडला आहे. अर्जुनाला स्वकीयांशी लढायचे होते म्हणून तो कर्तव्यच्युत झाला होता; आजचा युवान स्वतःशीच लढता लढता गलितगात्र होतो आहे. अशा संघर्षाच्या, संग्रामाच्या क्षणी जन्म होतो तो भगवद्गीतेचा! जगद्गुरू श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला मार्गदर्शन करताना गीतेचा निर्घोष केला. हीच भगवद्गीता आजही आपल्यासाठी तशीच मार्गदर्शिका आहे!

गीता रणभूमीवर जन्माला आली. याचाच अर्थ, जो योद्धा आहे त्याच्यासाठी गीता आहे. योद्धा नेहमी तरुण असतो. अर्थात वृत्तीने तरुण असतो. अशा तरुणाला ‘तस्मादुन्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।’ असे म्हणून गीता जागृत करते आणि संघर्षासाठी सिद्ध करते.

ही जागृती आणि संघर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. काहींना ‘मी कोण?’ याबद्दलची जागृती आवश्यक असते. मी कोण आहे हे एकदा लक्षात आले की पुढची कोडी सोडविणे सोपे असते. श्रीकृष्णांनी त्यावेळी अर्जुनाला त्याच्या राजसी वृत्तीची, क्षात्रधर्माची आणि ‘युद्ध’ या कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच ‘सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः।’ असे म्हणून त्याच्या हृदयामध्ये स्थित ईश्वरी चैतन्याला साद घातली. तेच चैतन्य आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहे. त्या चैतन्याची जागृती हा ‘मी कोण?’ हे जाणण्याचा पहिला टप्पा. हे एकदा लक्षात आले की, माझ्यातली शक्तिस्थळे, उणिवा आणि मग माझे ध्येय या गोष्टी स्पष्ट होऊ लागतात.

काहीजण हा टप्पा पार करून पुढे आलेले आहेत. त्यांना ध्येय सापडले आहे आहे व ध्येयपूर्तीसाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा वेळी ‘उद्धरेदान्मनान्मजम्’ असे सांगून गीता प्रयत्न करायला शिकविते. तुला ध्येय साध्य करायचे असेल तर तुलाच प्रयत्न करावे लागतील, असे सांगून ती त्यांना बळ देते. असे अथक प्रयत्न आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जातात.

काहीजण त्याहीपुढच्या टप्प्यावर आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी ध्येय प्राप्त केले आहे. अशी ध्येयसिद्धी कधीकधी अहंकाराला कारणीभूत होते. संपत्ती, पद, प्रतिष्ठा, ज्ञान या आणि अशा अनेक प्रकारचा अहंकार अधःपतनाला कारणीभूत होतो. त्यामुळे ध्येयप्राप्ती होऊनही समाधान मिळत नाही. येथे गीता अहंकाराचा त्याग करायला शिकविते.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत्।

यन्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।

‘तू जे काही करतोस ते ईश्वराला अर्पण कर,’ असे गीता समजावते. कर्म समर्पणभावनेने केले की अहंकार आपोआप नष्ट होतो व निखळ समाधान प्राप्त होते.

काहीजण वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होऊन आनंदीही आहेत. येथे गीता समष्टीचा विचार करायला शिकवते. ‘लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि।’ असे ती सांगते. अर्थात, स्वतःच्या कर्मांनी सिद्ध झाल्यानंतर समाजातील इतर लेकांना उन्नत बनविण्यासाठी तू कार्य कर, असे गीता समजावते.

यानंतरच्या टप्प्यावर इहलोकातील सर्व पाशांचा त्याग करून संत ज्ञानेश्वरांसारखे काही महात्मे अमरत्वाला प्राप्त होतात. ईश्वराशी, चैतन्यमयी आत्म्याशी एकरूप होऊन सुख-दुःख, स्तुती-निंदा यासारख्या सर्व द्वंद्वांच्या परे जाऊन ते स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त झालेले असतात, अशा स्थितप्रज्ञांचे वर्णनदेखील गीता करते.

या सर्व आपल्या सर्वांच्या जीवनात येणाऱया विविध अवस्था आहेत. प्रत्येक अवस्थेमध्ये जेथे आहोत तेथून पुढे जाण्याचा मार्ग गीता समजावते. मात्र पुढे जाताना भक्तीचा भक्कम पायादेखील ती देते. जो भगवंतापासून विभक्त होत नाही तो भक्त. आपल्यात असणाऱया ईश्वरी चैतन्यापासून विलग न होता एक एक टप्पा पार करून समाधान आणि आनंदाच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत प्रेमाने आपले बोट धरून ती आपल्याला घेऊन जाते!

म्हणूनच गीताजयंतीच्या निमित्ताने गीतेकडे आपण मैत्रीच्या नजरेने पाहूया. माऊली म्हणतात त्याप्रमाणे ‘एक तरी ओवी अनुभवावी।’ असा प्रयत्न करूया! आपल्या सर्व समस्या सोडवून आशिष्ठ, द्रढिष्ठ, बलिष्ठ बनून राष्ट्रकार्यासाठी सज्ज होऊया व आपल्या तारुण्याचे सार्थक करूया!

आपली प्रतिक्रिया द्या