सांब सदाशिव शिव हरे रे!

122
  • अरविंद दोडे

सगळ्यांनाच महाशिवरात्रीचे वेध लागले आहेत. पाहूया शिवरात्रीच्या आणि भोळ्या सांबाच्या लडिवाळ गोष्टी…

क्षिणेतील शिवकथा आहे, ती अशी –

एक होता तरुण. तो अनेक पापकर्मे करीत असे. एकदा त्याची दुष्कर्मे इतकी वाढली की, त्याला राजाने हद्दपार केले. तो उपाशीपोटी वणवण भटकत भटकत प्रदोष काळी एका शिवमंदिरात आला. तेव्हा गाभाऱ्यात कुणी नव्हते. देवापुढे बरेच खाद्यपदार्थ होते. ते नीट दिसावेत म्हणून त्याने समईतील वात थोडी पुढे सारली. प्रकाश अधिक पसरला. तेवढ्यात पुजारी आला. अनोळखी तरुणास पाहून तो ओरडू लागला, ‘‘चोर, चोर’’. बाहेर बसलेले भक्तगण धावून आले. त्यांनी त्या तरुणास धरून बेदम चोप दिला. तो बिचारा उपाशी अखेर निप्राण झाला… ती महाशिवरात्र होती. त्या तरुणास उपवास घडला होता. त्याने दिवा उजळ केला होता. शिवाला हा उपचार भक्ती म्हणून भावला होता. शिवदूतांनी त्यास शिवलोकात आदराने नेले. त्यास मोक्ष मिळाला. तात्पर्य काय तर आपली भक्तिभावना दिवे लावणारी आहे. प्रकाश देणारी आहे. जो माणूस ज्ञानाचा प्रकाश देतो, त्याला म्हणतात सद्गुरू!

माघ वद्य चतुर्दशीला म्हणतात महाशिवरात्री! हे व्रत आहे. काम्य आणि नैमित्तिकसुद्धा. सर्वांसाठी असलेल्या या व्रतसमयी करतात उपवास, पूजापाठ आणि जागरण. शिवशंकर ही या व्रताची प्रधान देवता. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये जरी हे व्रत मनोभावे केले जात असले तरी त्या त्या राज्यातील संस्कृती आणि पूजाविधी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आहेत. त्याबाबत थोडेसे ‘महाशिवरात्री’निमित्त…

परमेश्वर आणि भोळा? नवलच आहे, नाही? ‘शिवपुराणा’तल्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या की, या प्रश्नाचे उत्तर मिळते. मुळातच शिवशंभू हा ईश्वर म्हणजे भणंग योगी. योग्यांचा महायोगी हा निर्मळ, निरागस आणि अजाण बालकाप्रमाणे जितका भाबडा असतो, तितकाच भोळा! सत्ता-संपत्ती आदी वैभवाचे सुख देणारा महाविष्णू वेगळा आणि ध्यानसुखाची परमसिद्धी देणारा महादेव वेगळा. समाधिसुखाची आत्मानुभूती मिळविण्यासाठी योगी-बैरागी यांचा आराध्य देव म्हणून शिवसाधना करतात. सर्वसामान्य भक्तांना मात्र सहजपणे पावणारा हा महादेव महाराष्ट्रात कशा रीतीने पुजला जातो हे समजून घेणे जितके ज्ञानवर्धक आहे, तितकेच मनोरंजकसुद्धा आहे.

शिवरात्रीला चार प्रहरी चार पूजा करतात. त्यांना म्हणतात यामपूजा. देवाला म्हणजे शिवलिंगाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करतात. धोत्रा, आंबा, बेलफळे वाहून बेलपत्रे अर्पण करतात. तांदळाच्या पिठाचे दिवे ओवाळतात. मंत्रजप करून अर्ध्य देतात. गायन, वादन, नर्तन, कीर्तन, प्रवचन, भजन रात्रभर करतात. पहाटे पुन्हा स्नान करून पुन्हा पूजा करतात. पारण्याला भंडारा करून भोजनाचा लाभ सर्वांना देतात. थोरांना, साधुसंतांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात. कुंभदान करतात. उद्यापन करताना नंदीसहीत उमापार्वतीची मूर्तिपूजा करतात. गरीबांना वस्त्रदान केल्यानंतर आचार्यपूजा केली जाते. ‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र प्रभावी असून संकटमुक्ती आणि भूतबाधेवर उत्तम उपाय आहे. शिवाय केवडा हा शिवाला प्रिय असून तो अर्पण करतात.

दक्षिण हिंदुस्थानात हा दिवस कसा साजरा होतो? शिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकदाच भोजन करून रात्री भजनपूजन करतात. पहाटे स्नान करून शिवपूजेत कमळे वाहतात. तांदळाची खीर (पोंगल) नैवेद्य म्हणून विशेष पदार्थ असतो. फक्त याच वेळी विष्णूची तुळस शंकराला वाहतात. श्रीखंड किंवा पीयुषाचा नैवेद्य चालतो. शिवाय तीळयुक्त भात नैवेद्यात ठेवून बेलपाने अर्पण करतात. चारी यामपूजेत चार प्रकारचे नैवेद्य असतात. चार वेदांचा मंत्रोच्चार करून नीळकंठाला नीलकमल समर्पित करतात.

शिवपुराणातील व्याध आणि हरिणीची कथा सर्वांना ठाऊक आहे. मृगहत्या करू नये, किंबहुना एकूणच वन्य जीवांची शिकार करू नये हा शुभसंदेश देणारी ही कथा निसर्गाच्या सुरेख जीवचक्रात अडथळा आणू नये हा पर्यावरणवादी सारांश सांगते. या कथेतला व्याध अमर झाला आहे. कारण त्याने नकळत शिवाला बेलपत्री वाहिली आणि त्याला शिवलोकाचा लाभ झाला. त्यालाच अंतराळात म्हणतात व्याधाची चांदणी.

शंकराची आरती समर्थ श्री रामदासांना सुचली. त्यात शिववर्णन असे केले आहे –
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शीतिकंठ निळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा।
जय जय शिवशंकर!

आपली प्रतिक्रिया द्या