भाई एस. एम. पाटील

47

भगवान परळीकर

शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून काम करणारे भाई एस. एम. पाटील यांची एक तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळख होती. प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या संपर्कात आल्याने ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले आणि अखेर श्वासापर्यंत शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले.  माढा तालुक्यातील वरवडे येथे २८ एप्रिल १९२९ रोजी जन्मलेल्या एस. एम. ऊर्फ संपतराव मारुतीराव पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबासाठी लढा उभारला.  एस. एम. पाटील हे १९६७ ते ७२ दरम्यान माढा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱयांच्या प्रश्नावर मोर्चे व आंदोलने केली. शेतकरी व त्याचे अर्थकारण याबाबत एक अभ्यासू नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. सोलापूर जिह्यातील सहकार क्षेत्रात ही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. चाळीस वर्षे ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष पदही भूषवले. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. राज्य परिवहन महामंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. शेतकऱयांच्या हक्काची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका जगल्या पाहिजेत आणि सरकारने त्यांना मदत केली पाहिजे यासाठी ते अखेरपर्यंत लढा देत राहिले. एस. एम. पाटील यांनी आपले सारे आयुष्य वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच घालवले. स्वतŠचे घर असूनही ते रात्री आरोग्य केंद्रातच झोपत असत. देशाने जे स्वातंत्र मिळाले आहे ते सामान्य शेतकऱयांच्या घरात आले नाही असे त्यांचे मत होते. २००८ मध्ये एस. एम. पाटील यांनी उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडावे यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी रात्री १२ वाजता काढलेला मशाल मोर्चा आजही लोक विसरलेले नाहीत. त्यांच्या निधनामुळे सोलापूर जिल्हयातील सहकार क्षेत्रात शेतक-यांसाठी झटणारा निस्पृह नेता हरपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या