भैरीबुवांचा शिमगोत्सव

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही खुप लोकप्रिय आहे. हुर्रा रे हुर्रा भैरीबुवाला सोन्याचा तुरा अशा फाका देत शिमग्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री श्रीदेव भैरीमंदिरातून पालखी निघते. यावेळी हजारो रत्नागिरीकर भैरीमंदिरात गर्दी करतात. प्रत्येकजण पालखीच्या दर्शनासाठी धडपडत असतो. ही पालखी वाजतगाजत मंदिरातून बाहेर पडते आणि शहरातून मार्गक्रमणा करत दुसऱ्या या दिवशी झाडगांव येथील सहाणेवर येऊन बसते. त्यानंतर त्याठिकाणी होळी उभी केली जाते. ही होळी उभी करताना रत्नागिरीकरांच्या एकजुटीचे दर्शन घडते. शेकडो लोक एकत्र येऊन ही होळी उभी करतात. त्यानंतर ५ दिवसांनंतर रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेव भैरीबुवांची पालखी सहाणेवरुन उठते आणि सगळीकडे रंगांची उधळण केली जाते. अन्यठिकाणी होळीच्या दुसऱ्या या दिवशी म्हणजे धुलीवंदनाला रंगांची उधळण केली जाते. रत्नागिरीत रंगपंचमीला सर्वजण रंगात न्हाऊन निघतात.

शिमगोत्सवात गोडे आणि तिखटे सण असे दोन प्रकार असतात. थोडय़ाफार या गोष्टी वारांवर अवलंबून असतात. बुधवार, शुक्रवार, रविवार आल्यास तिखटे सण जोरात साजरे होतात. गोड्या सणामध्ये पुरणपोळीसह पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो. तिखट्या सणाला चिकनवडे, मटणवड्यांवर ताव मारला जातो. शिमग्याला मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येतात. यावेळी पालखीला हातभेटीचा नारळ दिला जातो. तसेच नवसही फेडले जातात.

shimga-songa

 

शिमगा सुरु झाला की सोंगेही नाचू लागतात. आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना गल्ल्यात पैसा दिसतो हाय ना असं म्हणत संकासुर दुकानावर आणि दारावर नाचू लागतो. लोक स्वखुशीने यावेळी संकासुराच्या हातावर पैसे ठेवून दान देतात. लहान मुलेही छोटय़ा छोटय़ा पालख्या बनवून त्या घेऊन गावभर हिंडतात.