भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान

सामना प्रतिनिधी । नागपूर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कमचारी यांचे पथक (पोलींग पार्टी ) रविवारी रवाना करण्यात आली आहेत. भंडारा विधानसभा मतदार संघातील पोटींग पार्टीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण महिरे यांनी मतदान साहित्य देऊन रवाना केले. यावेळी तहसिलदार संजय पवार उपस्थित होते. तुमसर विधानसभेसाठी स्मिता पाटील, साकोली विधानसभेसाठी अर्चना मोरे, अर्जूनी मोरगाव शिल्पा सोनाले, गोंदिया अनंत वळसकर व तिरोडा जी.एन. तळपदे यांनी मतदान साहित्य देऊन पोलींग पार्टीला रवाना केले. मतदानाची वेळ सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० पर्यंत आहे. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे.

सोमवार होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्हयातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१४९ मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ४७२८ बॅलेट युनिट, २३६६ कंट्रोल युनिट व २७२४ व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त व शांततेत मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू व गोंदिया पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी केले आहे.