>> सूरज बागड, भंडारा
‘मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे’ ही म्हण मराठीत प्रचलित आहे. याचाच भयंकर अनुभव भंडारा जिल्ह्याच्या गराडा खुर्द येथे एका रेशन दुकानदाराच्या रुपातून समोर आला आहे.
भंडारा तालुक्यातील गराडा खुर्द गावातील स्वस्त रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तींच्या नावाचं धान्य खात आहे. या दुकानदाराने मृतांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद केलं. पण तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिला जातो. इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू तीन वर्षापूर्वी मृत झाल्या पण त्यांच्या नावाचे धान्य रेशन दुकानदार उचल करत होता. सरपंच बाईंनी ऑनलाइन माहिती तपासली तेव्हा सर्व भोंगळ कारभार समोर आला आहे. आता या संदर्भात आणखी खोलवर गेल्यावर जे गावातील रहिवासी नाहीत अशा लोकांच्या नावाने देखील रेशन कार्ड बनविण्यात आले. गावातीलच नागरिक अंतोदय योजनेपासून वंचित आहेत मग बाहेरगावातील नगरिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले. रेशन कार्ड तयार होताना तालुका पुरवठा विभाग काय करत होता कोणी रेशन कार्ड तयार केले हा संशोधनाचा विषय आहे.
एक रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तींच्या नावाने धान्य उचल करत आहे. पण पुरवठा विभागाने साधी चौकशी देखील केली नाही. तर आता तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाही करीता जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी सत्यम बांते यांनी दिली आहे.
एका गावात असा प्रकार सुरू असून जर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानाची चौकशी केली तर आणखी काही गंभीर प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.