भंडारा: पोलीस अधिकाऱ्यानं चहा टपरी चालकाच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ CCTV कॅमेरात कैद

bhandara-police-officer-slams-tea-vendor-video-captured-on-cctv-camera

>> सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्याच्या कांद्री येथील चहा टपरी चालक भालचंद्र तुरकर यांना पोलीस निरिक्षक विवेक सोनवणे यांनी कानशिलात लगावली. मारहाणीचा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मोहाडी तालुक्यातील कांद्री गावातील चौकात भालचंद्र तुरकर यांची चहा टपरी आहे. गोंदिया-रामटेक हा महत्त्वाचा मार्ग असून रात्रीच्या वेळी ट्रक चालक या चहा टपरीवर थांबून चहा पितात. पण 6 जून रोजी रात्री 2 च्या सुमारास आंदळगाव येथिल ठाणेदार विवेक सोनवणे हे रात्री आले व टपरी का सुरू ठेवली असं विचारत भालचंद्र यांच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आपल्या पोटापाण्यासाठी चहाची टपरी चालवणाऱ्यांवर पोलिसांची दादागिरी चालत आहे. मात्र अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात नाही, अशा प्रकारचा सूर शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस निरिक्षक विवेक सोनवणे यांच्याविरोधात तुरकर यांनी लेखी तक्रार नोंदवली असून याप्रकरणी योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.