भंडारदरा येथे दारुच्या नशेत हैदोस घातला, श्रीरामपुरातील सहा तरुणांना अटक

भंडारदरा येथे दारूच्या नशेत मारहाण आणि विनयभंग करत हैदोस घालणाऱ्या श्रीरामपूर येथील सहा तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून राजुर पोलिसांनी सहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

श्रीराम केशव जंगले (वय 26, रा. पुर्णवाद नगर वार्ड क्र. 7, श्रीरामपुर), अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28, रा. श्रीरामपूर) उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर), सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर), वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर), विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत.

भंडारदरा धरणाच्या परिसरात एक पती पत्नी आपल्या स्टॉल चालवतात. शुक्रवारी हे दांपत्य आपल्या स्टॉलवर चहा बनवत असताना तेथे तवेरा गाडी (एम एच 20 बी. एन 6192) थांबली. गाडीतून सहा तरुण उतरले. आम्हाला अंडाभुर्जीची ऑर्डर दिली आणि सिगारेट मागितली. त्याला या दांपत्याने नकार देत सिगारेट विकत अथवा आणून देत नसल्याचं सांगितलं.

त्याचा राग आल्याने तरुणांनी या स्टॉल मालकास मारहाण करण्यास सुरूवात केली. एकाने महिलेचे कपडे ओढून तिच्यासोबत विनयभंग केला. महिलेने आकांत केल्याने आजुबाजुचे दुकानदार जमा झाले. मद्यधुंद तरुणांनी महिलेस सोडवणाऱ्यांनाही मारहाण केली.

स्टॉलची मोडतोड करत अंडी, पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स, गॅस शेगडी इत्यादी साहित्य फेकून दिले. आजूबाजूच्या स्टॉलचे नुकसान केले. आरडा ओरडा करत तवेरा गाडीतून निघून गेले. या घटनेनंतर सर्व स्टॉल धारकांनी भंडारदरा फॉरेस्ट चेक पोस्ट गाठला. तेथील अधिकाऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तवेरा गाडीचा शोध सुरू केला. गाडी सापडताच राजूर पोलीस स्टेशन कळवण्यात आलं. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी सहा जणांना ताब्यात घेतले. या सहा तरुणांविरुद्ध विनयभंग, मारहाण, नुकसान इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या