Bharat Biotech Tirumala Donation – कृष्णा इल्ला यांचे तिरुपती देवस्थानाला 2 कोटींचे दान

कोव्हॅक्सिन लस बनविणाऱ्या हिंदुस्थानी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी तिरुपती येथील तिरुमला देवस्थानाला 2 कोटी रुपयांचे दान दिले आहे. इल्ला हे हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीचे संस्थापक आहेत. मकर संक्रांतीपूर्वी आलेल्या वैकुंठ एकादशीला त्यांनी हे दान दिले आहे. इल्ला यांनी 13 तारखेला पत्नी सुचित्रा यांच्यासह व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दानाच्या रकमेचा चेक देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. तिरूपती देवस्थानातर्फे गरजू भक्त आणि गरिबांसाठी अन्नछत्र चालवलं जातं. श्री व्यकटेश्वरा अन्नप्रसाद ट्रस्टकडे या अन्नछत्राची जबाबदारी आहे. आपण दान केलेल्या रकमेचा गरजूंना पोटभर अन्न मिळावं यासाठी केला जावा अशी विनंती इल्ला यांनी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे.

कोव्हॅक्सिनचा प्रिकॉशन डोस ओमायक्रोन, डेल्टावर भारी

ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार उडलेला असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिनच्या प्रिकॉशन डोसमध्ये ओमायक्रोन आणि डेल्टाला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. सदरची बाब आम्ही केलेल्या चाचण्यांमधून स्पष्ट झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या व्हेरिएंटवर प्रभावीपणे काम करत आहेत. तसेच प्रिकॉशन डोस ओमायक्रोन आणि डेल्टावर भारी पडत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप किंवा अंग दुखत असेल तर त्यावर पॅरासिटॅमोल ही गोळी घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. लहान मुलांच्या काही लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटॅमोल किंवा पेनकिलर गोळी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे लक्षात आल्याने कंपनीने आपली भूमिका मांडली आहे. तसेच आम्ही 30 हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या केल्या आहेत. यामध्ये 10-20 टक्के लोकांनाच साईड इफेक्ट जाणवला आहे. अनेकांमध्ये ही सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवत असून दोन-तीन दिवसांत ती निघून जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही.

हिंदुस्थानच्या ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देण्यासाठी परदेशी कंपन्यांनी अडथळे आणले!

‘हिंदुस्थानच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळण्यापासून रोखण्याचा अनेक परदेशी कंपन्यांनी प्रयत्न केला होता,’ असा गौप्यस्फोट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केला आहे. नुकत्याच हैदराबाद येथे आयोजित रामनेनी फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

औषध विज्ञानाच्या विकासात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एम. इल्ला आणि सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एम. इल्ला यांचा रामनेनी फाऊंडेशनकडून गौरव करण्यात आला. या सोहळ्यात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ‘भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे आणि अगदी नवीन व्हेरिएंटवरदेखील काम करते असे अभ्यासक सांगतात, परंतु अनेकांनी त्यावर टीका केली.  कारण ही लस हिंदुस्थानात बनवली होती. काहींनी ‘डब्ल्यूएचओ’कडे तक्रारही केली होती. फायझरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंदुस्थानी लसीविरोधात काम केले असताना देशातही अनेकांनी या लसीला जागतिक मान्यता मिळवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत.’