
‘‘आर्यन शाळेचा मी विद्यार्थी हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. मराठी साहित्य, मराठी संस्कृती यांचे संस्कार आमच्यावर अर्थातच शाळेने केले. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी. आमच्या आर्यन शाळेत भगवद्गीता हा विषय अभ्यासाला होता. भगवद्गीतेवर पेपर असायचा. शाळेतील सर्व शिक्षक खूप प्रेमळ आणि मुलांना उत्तम शिक्षण देणारे होते. मांजरेकर सर, भागवत सर, देखणे सर, रणदिवे सर, हेडमास्तर खेर सर, नाबर मॅडम या सर्वांनी आमच्यावर संस्कार केले.
आर्यन शाळेत विद्यार्थ्यांकरिता मोफत व्यायामशाळा होती हे आमच्या शाळेचे अजून एक वैशिष्टय़ म्हणता येईल. आम्ही नाटक सादर करायचो आणि त्या नाटकासाठी जशी रंगभूषा लागते, वेशभूषा लागते, तो सगळा खर्च शाळेतर्फे केला जायचा. पालकांना त्यासाठी पैसे भरावे लागत नव्हते. आमच्या शाळेत खेळांनाही प्रोत्साहन मिळायचे. कबड्डी, खो-खो यांचे संघ आंतरशालेय सामन्यांतून यशस्वी होत होते.
आमच्या शाळेचे वाचनालयदेखील खूप मोठे आहे. मान्यवर लेखकांची पुस्तके मी वाचायचो, त्यातून वाचनाची आवड विकसित झाली. एखाद्या स्पर्धेत यश मिळाले किंवा अभ्यासात यश मिळाले की, शाळेकडून एक रुपया बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक मिळायचे. त्या एक रुपयातून तेव्हा मी मराठी पुस्तक विकत घ्यायचो. तो एक रुपयासुद्धा खूप मोलाचा होता. मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकडे शाळा लक्ष द्यायची. आज जेव्हा आम्ही शाळेतील विद्यार्थी भेटतो तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावल्याचे कळते. चित्तरंजन पुरंदरे, अनंत शेंडे, प्रकाश कबरे अशी अनेक नावे घेता येतील. आज माझ्या करीअरमध्ये मी अनेक इंग्रजी नाटके लिहिली. माझे शिक्षण मराठी भाषेतूनच झाले आहे. माझ्या सांस्कृतिक जडणघडणीत आर्यन शाळेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.’’