काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एसी रे एसी’; भरत जाधव घामाघूम

105

सामना प्रतिनिधी । ठाणे

वर्षभरापूर्वीच मोठी दुरुस्ती केलेल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी ‘एसी रे एसी’चा  प्रयोग रंगला. वातानुकूलित यंत्रणेबद्दल अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘एसीचे कुलिंग’च लागत नसल्याने प्रयोग सुरू असताना भरत जाधव घामाघूम झाले. नाटकाच्या मध्यंतरात त्यांनी थेट फेसबुक लाइव्ह करून ‘घाणेकर नाट्यगृहात मी पावसाने नव्हे तर घामाने भिजलो आहे’ असे सांगत तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि याची दखल घेण्याची मागणी केली.

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता भरत जाधव निर्मित ‘पुन्हा सही रे सही…’ या नाटकाचा प्रयोग होता. या नाटकात भरत जाधव यांची मुख्य भूमिका आहे. प्रयोग सुरू असतानाच भरत जाधव यांनी वातानुकूलित यंत्रणेतून कुलिंग होत नसल्याची तक्रार केली. दोन-तीन वेळा सांगूनही तेथील कर्मचार्‍यांनी थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेल्याची तक्रार भरत जाधव यांनी केली.

मध्यंतरात त्यांनी त्यांच्या घामाघूम अवस्थेचे थेट फेसबुक लाइव्ह केले. “मी असा ओला चिंब वाटतोय ना. घाबरू नका, मी पावसात भिजलेलो नाही. मी घामाने भिजलोय. माझा काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रयोग सुरू आहे, पण एसीच काम करत नाहीये. ही दुसरी का तिसरी वेळ आहे. वारंवार सांगितल्यानंतरही हो…. एसी सुरू आहे, वाढवायला सांगितला आहे अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. म्हणून नाइलाजाने मला ऑनलाइन यावे लागले. ’’ असे भरत जाधव यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

कलाकारांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य; योग्य तो सन्मान राखला जाईल!

या घटनेनंतर महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी नगर अभियंता, बांधकाम खात्याचे अधिकारी, वातानुकूलित यंत्रणेचे तंत्रज्ञ यांच्यासह तत्काळ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहास भेट दिली. तेथील वातानुकूलित यंत्रणेसह अन्य सुविधांची पाहणी केली. भरत जाधव यांना जो त्रास आणि मनस्ताप झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगून म्हस्के म्हणाले, जाधव यांच्या ‘पुन्हा सही रे सही’ नाटकानंतर प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होता. त्यावेळी टेम्प्रेचर तपासले असता कुलिंग योग्य असल्याचे दिसले. ‘सही रे’च्या प्रयोगात कदाचित सेटचे सामान मोठ्या दरवाजातून आत आणताना तो चुकून उघडा राहिला असावा त्यामुळे तसेच थोडे सिलिंगचेही काम सुरू आहे त्यातून कदाचित कुलिंग बाहेर गेले असावे. तरीही कलाकारांची काळजी घेणे, त्यांचा योग्य तो सन्मान राखणे हे ठाणे पालिका म्हणून आमचे कर्तव्य आहे. भविष्यात अशा तक्रारी येणार नाही त्यासाठी योग्य ते आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या