भरत जाधव बनणार विठुराया

383

सामना ऑनलाईन । मुंबई

तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठुरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. आता मालिकेचे नवे पर्व सुरू होणार आहे. या पर्वात प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धा स्थान असलेल्या विठ्ठल रखुमाईची संसारगाथा बघायला मिळणार आहे.

पहिल्यांदाच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव विठ्ठ्लाच्या भूमिकेत तर स्मिता शेवाळे रखुमाईच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना या पर्वामध्ये तुकारामांच्या मुखी विठ्ठल –रखुमाईची संसारगाथा ऐकायला मिळणार आहे.

विठ्ठल म्हणजे कृष्णाचं रूप, पण यामागे देखील आख्यायिका आहे. असे म्हणतात कि, रुक्मिणी काही कारणास्तव कृष्णावर रुसली आणि द्वारका सोडून पृथ्वीतलावर आली. आपल्या रुसलेल्या पत्नीच्या शोधात कृष्ण विठुरायाचं रूप घेऊन पृथ्वीवर आला. पण, नव्या रुपात समोर उभ्या ठाकलेल्या कृष्णाला रुक्मिणी ओळखूच शकली नाही. आपल्या चतुर बोलण्याने विठ्ठ्लाने रुक्मिणीचे मन जिंकले आणि तिचा सखा बनला. पण, असं काय झालं कि रुक्मिणी द्वारका सोडून पृथ्वीतलावर आली? सत्यभामा आणि रुक्मिणीचे नाते कसे होते? पूर्णपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाकडून कोणती चूक घडली? रुक्मिणीला कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहे हे सत्य कळेल तेव्हा काय होईल? कृष्ण आपल्या पत्नीचा राग कसा शांत करेल ? हे बघणम नक्कीच रंजक असणार आहे.

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भरत जाधव पहील्यांदाच पौराणिक मालिकेमध्ये काम करत आहे ज्यांच्या बरोबर प्रेक्षकांना स्मिता शेवाळे देखील असणार आहे. या दोघांनी याआधी एकत्र काम केलं असलं तरीही हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. ही विठ्ठल रखुमाईची संसारगाथा येत्या सहा सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर दाखवली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या