जगातील सर्वात ‘श्रीमंत’ भिकारी, मुंबईत 2 BHK फ्लॅट, ठाण्यात दुकानं; संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील

भिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं… तर कळकट मळकट कपडे, अंगाचा येणारा कुबट वास, विस्कटलेल्या केसांच्या झालेल्या जटा आणि गरिबी, आर्थिक समस्यांचा सामना करणारा दयनीय माणूस… पण तुम्हाला म्हटलं की एक असाही भिकारी आहे ज्याच्याकडे तब्बल साडे सात कोटींची संपत्ती आहे तर… तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण हे खरे असून जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतोय.

भरत जैन (Bharat Jain) असे जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याचे नाव आहे. मुंबईतील रस्त्यांवर ते भीक मागताना दिसतात. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी भीक मागून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. मुंबईत त्यांचा फ्टॅटही असून पत्नी, दोन मुलं, भाऊ आणि वडिलांसह ते राहतात.

भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.2 कोटी रुपयांची किंमत असणारा 2BHK फ्लॅट आहे. तसेच ठाण्यात दोन दुकानंही त्यांच्या नावावर आहेत. तिथून त्यांना 30 हजार रुपये महिना मासिक भाडेही मिळते.

भरत जैन हे छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदान यांसारख्या मुंबईतील प्रमुख भागात भीक मागताना दिसतात. त्यांची एकूण संपत्ती साडे सात कोटी रुपयांची आहे. एवढी संपत्ती असूनही मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याचे काम ते करतात. ते दररोज 10 ते 12 तास भीक मागतात, आणि 2 ते 3 हजार रुपये कमावतात.

जैन आणि त्यांचे कुटुंब परळमधील एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या मुलांचे कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झालेले आहे, तर कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने कुटुंबियांनी त्यांना भीक मागणे बंद करा असा सल्ला दिला. मात्र ते कुटुंबाचे ऐकत नाहीत.