‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे; प्रणिती शिंदे यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद बघून भाजपने यात्रेचा धसका घेत त्यावर टीका सुरू केली आहे. मात्र, या यात्रेला जनतेचा प्रतिसाद वाढतच आहे. यात्रेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाला यात्रेवरून टोला लगावला आहे. त्या अकोल्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

ही यात्रा अकोल्यासह महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमधून जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांतून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जाणार आहे. आमचं भाग्य आहे की ती यात्रा अकोल्यातूनही जाणार आहे. यात्रेदरम्यान अकोल्यात राहुल गांधींची सभादेखील होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

राहुल गांधींच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपाने धसका घेतला आहे. त्यामुळे आमची यात्रा निष्प्रभ करण्यासाठी ते वेगवेगळ्या योजना आखत आहेत. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोक राहुल गांधींसोबत चालत आहेत. भाजपालाही वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद या यात्रेला मिळेल. पण मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपा पॅनिक मोडवर गेली आहे, असे प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अकोल्यात एका शाळेत आणि एका फार्महाऊसवर मुक्कामाला थांबणार आहेत. मूलभूत व्यवस्थेमध्ये राहुल गांधी राहणार आहेत. भाजपाच्या लोकांसारखे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहणार नाहीत. शिवाय राहुल गांधी स्वत: अनेक किलोमीटर रोज चालत आहेत. हे सगळं बघून भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली.