अर्थसंकल्पावर नाराज आरएसएसचा सहकारी करणार आंदोलन

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारने २०१९पूर्वीच्या आपल्या अखेरच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय आणि नोकरवर्गासाठी विशेष कोणती तरतूद न केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहकारी नाराज झाला आहे. आरएसएसची सहकारी संघटना भारतीय मजदूर संघाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प निराशनजक असल्याचे म्हणत याविरोधात देशभर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीकडे दृष्टी ठेवत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर आरएसएसच्या सहकारी संघटनेने नाराजी जाहीर केल्याने भाजपचे ‘अच्छे दिन’ संपल्याचे बोलले जात आहे.

अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत भारतीय मजदूर संघाने कामगार वर्ग आणि नोकरवर्गासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली नसल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्पात कररचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याशिवाय कामगारांच्या हितासाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही. तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्ससाठीही सरकारने काहीच न केल्याने निराशाजनक वातावरण आहे. याविरोधात शुक्रवारी देशभरात आंदोलन करणार असल्याचे भारतीय मजदूर संघाने जाहीर केले आहे.

भारतीय मजदूर संघ आरएसएसची सहकारी संघटना आहे. कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी ही संघटना कार्य करते. याआधीही भारतीय मजदूर संघाने मोजी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला होता. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या आणि मध्यम व्यापारी वर्गाला नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या