‘भारत बंद’मध्ये कामगारांनी सहभागी व्हावे, भारतीय कामगार सेनेचे आवाहन

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या 26 नोव्हेंबरच्या भारत बंदात भारतीय कामगार सेनेच्या संलग्नित सर्व कामगारांना सामिल होण्याचे आवाहन भारतीय कामगार सेनेतर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कारखाने, आस्थापना, उद्योग, हॉटेल्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्य़ा सर्व कामगारांनी यात सामील व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नयेत तसेच बंद यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलींचे काटकोरपणे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.   

भारतमाता येथे जनसंघर्ष आंदोलन

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ दि. 26 नोव्हेंबर रोजीच्या देशव्यापी आंदोलनात पूर्ण ताकदीनीशी उतरणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन आहिर यांनी जाहीर केले आहे. तर यानिमित्ताने भारतमाता येथे जनसंघर्ष आंदोलनदेखील छेडणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ(इंटक)च्या पदाधिकाऱ्य़ाची आज मजदूर मंझीलमध्ये संयुक्त सभा पार पडली या सभेत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर हे मार्गदर्शन करणार असून कामगार संघटना संयुक्त पृती समितीचे महाराष्ट्राचे सहनिमंत्रक विश्वास उटगी आदी कामगार नेते या आंदोलन प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी लक्ष्मण तुपे, शिवाजी काळे यांची याप्रसंगी भाषणे होतील.  

मुंबई काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा

केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मुंबई काँग्रेसने आपला पाठिंबा दर्शविला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून मुंबई काँग्रेस यात सक्रिय सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ गायकवाड म्हणाले की, भाजप सरकारने जुने कामगार व शेतकरी कायदे रद्द केले आणि शेतकरी व कामगारांची पिळवणूक करणारे  कामगार व शेतकरी   कायदे लागू करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. या  कामगार व शेतकरी  विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी इंटकतर्फे पुकारण्यात आलेल्या या ’भारत बंद’ला मुंबई काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून, मुंबई काँग्रेसचा या संपामध्ये सक्रिय सहभाग असणार आहे. मुंबई काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उस्फूर्तपणे या ’भारत बंद’ मध्ये सहभागी होणार असल्याचे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.  

कष्टकऱ्य़ांचा देशव्यापी एल्गार

कामगार व शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार व शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत असून आता इंटकसह इतर कामगार संघटनाही मैदानात उतरल्या आहेत.हिंद मजदूर सभेच्या महाराष्ट्र कौन्सिलने पसिध्द पत्रक जारी केले आहे. कामगार विरोधी कायदे मागे घ्या पूर्वीचे कायदे लागू करा, रेल्वे वीमा, बंदरे व संरक्षण  अशा महत्वाच्या सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवा या क्षेत्रांमध्ये परदेशी गुंतवणूक नको अशा वेगवेगळ्या 11 मागण्या केल्या आहेत. हा संप यशस्वी करण्याचे आवाहन हिंद मजदूर सभेच्या कामगार नेत्यांनी केले आहे.

राज्य कर्मचाऱ्य़ांचा लाक्षणिक संप

कर्मचाऱ्य़ांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने 26 नोव्हेंबरला लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या संपाला पाठिंबा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या