नवसाला पावणारी दहिसरची भाटलादेवी

92

दहिसर पूर्वेला भरुचा मार्गाच्या बाजूस भाटलादेवीचे जागृत मंदिर आहे. या देवीची मूर्ती ही शिलास्वरुपाची आहे. ही मूर्ती चिमाजी अप्पा यांनी वसईवरुन आणली आणि ती भाटला गावामध्ये ठेवली. वसईमध्ये त्यावेळी पोर्तुगिजांचे राज्य होते. पोर्तुगीज सैन्य त्यावेळी वसईमध्ये येऊन तेथील देवळे आणि मूर्तींची विटंबना करीत. देवाची अशी विटंबना चिमाजी अप्पांना आवडली नाही. गेली 18 वर्षे चिमाजी अप्पा याच कारणाने पोर्तुगीजांशी लढत होते. शेवटी त्यांनी तेथून ती मूर्ती आणि सोबत आणखी तीन मूर्ती आणल्या.

भाटलादेवीची मूर्ती त्यांनी भरुच्या मार्गाच्या बाजूस जमिनीवर बसविली होती. या देवळाच्या बाजूने पाण्याचे तळे आहे. बरीच वर्षे ती मूर्ती तिथे होती. त्या मूर्तीच्या आजूबाजूला मोठे शेत होते. येथील स्थानिक लोक या देवीला नवस करु लागले. देवी भक्तांना पावते अशी लोकांची श्रद्धा आहे. दहिसर येथील भाविकांनी त्या जागेवरुन ती मूर्ती हलवून मंदिर बांधले. नंतर भाटला देवी मंदिराच्या बाजूस गणपती, श्रीदत्त, शिव, मारुती, राधाकृष्ण यांची मंदिरे बांधली.

येथे नवरात्रौत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. एप्रिल महिन्याच्या अखेरीस वार्षिक महोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मोठय़ा संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतात. देऊळ आता चांदीच्या मखराने सजविलेले आहे. त्यामुळे लोकांचे आकर्षण जास्त वाढलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण मुंबईतून भाविक येतात

आपली प्रतिक्रिया द्या