किंगमेकर रॉय डायस

524

द्वारकानाथ संझगिरी

श्रीलंकेच्या माझ्या पहिल्या दौऱ्याने माझे श्रीलंकेच्या खेळाडूंबरोबरचे संबंध घट्ट झाले. गैरसमज करून घेऊ नका. आजच्या कुठल्याही त्यांच्या खेळाडूंशी माझी वैयक्तिक पातळीवर ओळख नाही. जनरेशन गॅप वाढत गेली की तशी मैत्री होत नाही. तुमच्या वयामुळे तुम्ही ‘अंकल’ किंवा ‘सर’ होऊन जाता आणि तुमच्यातली दरी वाढते. त्यावेळी मी त्या खेळाडूंसाठी नुसता ‘पप्पू’ होतो. माझ्या ‘द्वारकानाथ’ या नावाचा त्यांच्याशी कधीही संबंध आला नाही. आडनावाचा संबंध फार नंतर आला. माझे ‘द्वारकानाथ’ हे नाव उच्चारेपर्यंत दुलीप मेंडीसची स्क्वेअरकट सीमापार गेली असती. त्यामुळे ‘पप्पू’ हे माझे टोपणनाव मी त्यांना सांगितले. त्यावेळी ते आजच्याएवढे बदनाम नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे, ते त्या नावाचा उच्चार ‘पप्यू’ किंवा ‘पापू’ असा करत. आजही त्यात बदल नाही. त्यांचे उच्चार काहींबाबतीत वेगळे असतात. ते तसे जगभर असते. ते क्रिकेटचा उच्चार ‘क्रिकट’, विकेटचा उच्चार ‘विकट’ असा करतात. बंगालमध्ये मित्र किंवा व्यक्तीला संबोधताना ‘दादा’ किंवा नुसतं ‘दा’ जोडतात. उदा. बर्मनदा, पंचमदा, बिमलदा किंवा हरयाणात कपिलदेव हा कपिलपाजी होतो. पण ही प्रत्येक बोलीची खासियत आहे. (मराठीत ‘पाजी’ शब्द जोडला की माणूस ‘पाजी’ ठरतो.) तसे श्रीलंकेत ‘मचा’ जोडलं जातं. अर्थात प्रत्येकवेळी नाही. पण कधी प्रेमाने, जिव्हाळ्याने हाक मारताना. श्रीलंकेत मी ‘पापू’चा ‘पापूमचा’ कधी झालो कळलंच नाही.

या मैत्रीची सुरुवात रॉय डायस या त्यांच्या शैलीदार फलंदाजापासून झाली. १९८५च्या पहिल्या दौऱ्याच्या पहिल्या वन डेत रॉय डायसने ‘नयनरम्य’ हा शब्द अगदीच तोकडा पडावा अशी फलंदाजी केली. त्यानंतर माझं असं मत पडलं की, रॉय डायस श्रीलंकेऐवजी हिंदुस्थानात जन्माला आला असता तर त्या काळात किमान गावसकर, विश्वनाथच्या खालोखाल धावा त्याने केल्या असत्या. त्याच्या फलंदाजीत थोडा गावसकरही होता आणि थोडा विश्वनाथ! यात अजिबात अतिशयोक्ती नाही. मी सोनम कपूरला सेक्सी किंवा सनी लियॉनला सोज्वळ म्हणण्याप्रमाणे अतिशयोक्ती करीत नाहीए. रवी शास्त्री, वासू परांजपे वगैरे ज्ञानी मंडळींचंही हे मत होतं. तंत्रशुद्धता आणि कलात्मकता याचा अफलातून संगम त्याच्या फलंदाजीत होता. तो कव्हर ड्राइव्ह असा खेळायचा की, वॉली हॅमंड, विजय हजारेंचा तो पट्टशिष्य असावा असं वाटायचं. मनगटाने ऑनला चेंडू इतक्या सहजतेने वळवायचा की, त्याच्या मनगटात बॉलबेअरिंग्ज बसवली आहेत अशी शंका यावी. त्याच्या फलंदाजीच्या शैलीच्या जवळ जाणारा नंतरचा श्रीलंकेचा फलंदाज म्हणजे महेला जयवर्धने. त्यांच्या पद्धतीने उच्चार करायचा तर जयवर्धनं!

श्रीलंकेच्या सरावाच्या वेळी मी त्याला भेटलो. त्याचं कौतुक केलं. त्याला मी मुलाखतीची विनंती केली. दुसऱ्या दिवशी एका फोटोग्राफरसह मी त्याच्या घरी पोहोचलो. कोलंबोच्या हद्दीच्या बाहेर त्याचा बंगला एका टुमदार गावात होता. तोही गल्लीतला शेवटचा बंगला! त्यापुढे फक्त हिरवा निसर्ग. श्रीलंकेला निसर्गाच्या हिरव्या रंगाचं वरदान आहे. त्यानंतर अनेकदा मी त्या बंगल्यावर गेलोय, पण तो निसर्ग आहे तसा आहे. तिथे टॉवर उभा राहिल्याचं पाहिलं नाही. ‘ग्रीन झोन’ कशी उठवावी, तिथे टॉवर्स कसे उभारावेत याचे ज्ञान श्रीलंकेतल्या राजकारणी आणि इंजिनीअर मंडळींना नाही का? श्रीलंका हा काही भ्रष्टाचारमुक्त देश नाही. त्यांनी आपल्याइथला त्याबाबतीतला क्रॅशकोर्स करायला हवा. असो. तर त्या दिवशी दीड-दोन तासांच्या गप्पांमध्ये आम्ही दोघं एकमेकांचे मित्र कधी झालो कळलंच नाही. तो फक्त त्याच्या मस्त सिंहली बीयरचा आणि चिकन सॉसेजेस्चा परिणाम नव्हता. हे कुठले तरी ऋणानुबंध होते. काही ऋणानुबंधांचं कळतच नाही. का एखाद्या विशिष्ट व्यक्तीबरोबर मैत्रीचे धागे जुळतात? तेसुद्धा अनोळखी जगात. ज्या भाषेत मी लिहीत होतो त्या भाषेचं त्याला ज्ञान नव्हतं. रॉय डायसला माहीतही नव्हतं, मी त्याच्याबद्दल काय लिहिलंय. पण त्याने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. तो तसा पत्रकार टाळणारा माणूस. तरीही त्याला एका अनोळखी माणसाशी मोकळेपणाने का बोलावंसं वाटलं? बरं, त्या क्षणी बोललो. मी लिहिलं आणि संपलं असं झालं नाही. मैत्री घट्ट घट्ट होत गेली. आजही वर्ष वर्ष आमचे फोन नसतात; पण मी श्रीलंकेत गेलोय आणि रॉय डायसकडे जेवायला गेलो नाही असं कधी झालंच नाही. मध्यंतरी मी नेपाळला फिरायला गेलो होतो. त्यावेळी रॉय डायस नेपाळच्या संघाचा प्रशिक्षक होता. रॉयच्या बायकोकडून मी नंबर घेतला आणि त्याला फोन केला. त्याला सुखद धक्का बसला. दुसऱया दिवशी संध्याकाळी त्याच्या हॉटेलवर त्याच्यासह ग्लेन लेव्हीट माल्ट व्हिस्की माझी वाट पाहत होती.

रॉय डायसच्या जेवणावरून मला एक किस्सा आठवला. १९९३ची गोष्ट आहे. त्या दौऱ्यावर विनोद कांबळी प्रचंड फॉर्मात होता. पहिल्या दोन कसोटींच्या आदल्या दिवशी मी, माझी बायको आणि तो एकत्र जेवलो आणि त्यानंतर त्याने शतकं ठोकली. मी त्याला म्हटले, ‘पाहिलंस, माझ्याबरोबर जेवण किती लक्की ठरतं ते.’ जवळपास प्रत्येक क्रिकेटपटू काही ना काही अंधश्रद्धा बाळगत असतो. विनोदच्या हे डोक्यात बसलं. तिसऱया कसोटीच्या आदल्या दिवशी मी रॉय डायसकडे जेवायला गेलो. विनोद म्हणाला, ‘निदान रात्री एकत्र कॉफी तरी पिऊ…’ रॉयकडून येताना आम्हाला उशीर झाला. विनोद कधी नव्हे तो त्या दिवशी लवकर झोपला आणि दुसऱया दिवशी लवकर बाद झाला. (लवकर झोपल्याचा परिणाम?) आणि मग मला विनोदची ‘दूषणं’ ऐकायला लागली.
रॉय डायसच्या माझ्या प्रेमामुळे अनेकांनी मला विचारलं की, डायस खरंच केवढा मोठा फलंदाज होता. मी दोन महान खेळाडूंचे त्याच्याबद्दलचे किस्से सांगतो.

एक होता वेस्ट इंडीजचा रोहन कन्हाय. एका बेनिफिट मॅचमध्ये रॉय डायस वेस्ट इंडीजमध्ये खेळत होता. ५०-६० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतत होता. पॅव्हेलियनमध्ये त्याला कन्हायने विचारले, ‘रॉय, तुझा जन्म किती सालचा?’ रॉय म्हणाला, ‘१९५२चा.’ कन्हायने निराशपणे मान हलवली आणि म्हणाला, ‘नाही. मी तिथे १९५४ साली होतो.’ रॉयला कळेना, कन्हाय असं का म्हणतो. त्याने कन्हायला विचारलं, ‘तुम्ही असं का म्हणालात?’ कन्हाय म्हणाला, ‘म्हणजे तू माझा मुलगा नाहीस, पण मग तू माझ्यासारखी बॅटिंग कशी करतोस?’

दुसरा किस्सा विव्ह रिचर्डस्चा. १९८४च्या ऑस्ट्रेलियातल्या बेन्सन ऍण्ड हेजेस’ स्पर्धेनंतर विव्ह रिचर्डस्ने जागतिक संघ काढला. रवी शास्त्रीला ऑडी मिळाली तीच ही स्पर्धा. विव्ह रिचर्डस्ने त्यात तिसऱ्या क्रमांकावर रॉय डायसला घेतला होता.

रॉयचं बोट धरून मी श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये कधीही शिरायचो आणि त्या दौऱ्यावर माझं स्वागत हेनिकन बीयरच्या हिरव्या कॅनने व्हायचं. तिथून १९९६पर्यंत अनेक श्रीलंकन खेळाडू माझे मित्र होते. त्यांच्याबरोबर मी पाहुणचार घेतला. पण ती सुरुवात केली रॉय डायसने. त्या दौऱ्यावरून परतताना मी, डायस आणि मेंडीस आम्ही तिघं एका रेस्टॉरंटमध्ये खेकडे खायला गेलो. खेकडा हा कासवाच्या आकाराचा असू शकतो हे मला प्रथम तेव्हा कळलं. हा लेख लिहिताना जाणवलं, रॉय डायसला दोन वर्षांत फोन केला नाही. आज करीन म्हणतो!

आपली प्रतिक्रिया द्या