भाईंदरमध्ये भाजपची मोगलाई सुरूच! शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या जैनला स्थायी समितीचे सभापतीपद बहाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मीरा-भाईंदरमधील अश्वारूढ पुतळ्याला विरोध करणाऱ्या दिनेश जैन यांना सत्ताधारी भाजपने स्थायी समितीचे सभापतीपद बहाल केले आहे. पालिकेतील बहुमताच्या जोरावर मोगलाई कारभार करणाऱ्या भाजपवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली असताना माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी संपूर्ण ताकद लावत सभापतीपदाची माळ जैन यांच्या गळ्यात घातली. याविरोधात शिवप्रेमी जनतेसह सर्वपक्षीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून शिवसेनेने स्थायी समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. ब्राँझ धातूच्या या पुतळ्यासाठी 2 कोटी 95  लाख रुपयांची निविदा काढून शिल्पकार नेमण्यात येणार होता. याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीसमोर आला असता त्याला भाजप सदस्य दिनेश जैन यांनी विरोध केला. त्यांचीच री ओढत अन्य सदस्यांनी माना हलवत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

हा प्रकार समजताच शिवसेनेचे मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केला, परंतु याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत दिनेश जैन यांना स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी दिली. इतकेच नाहीतर निवडणूक पार पडेपर्यंत नरेंद्र मेहता पालिकेत ठाण मांडून होते. जैन हे मेहता यांचे कट्टर समर्थक असल्यानेच त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करूनही या महत्त्वाच्या पदाची माळ गळ्यात घातल्याचे बोलले जात आहे.

रद्द केलेला ठराव खंडित करा.. शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी

आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाजप सदस्यांनी बहुमताच्या जोरावर रद्द केलेला ठराव खंडित करण्याची मागणी केली. तसेच स्थायी समितीचा हा ठराव त्वरित शासनाकडे पाठवा, आम्ही महाराजांच्या पुतळ्याचा प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून आणू, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक जयंत पाटील उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या