निस्वार्थी सेवेचा संगम असणारा व्यक्ती देशाने गमावला – मुख्यमंत्री

91

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहत्या घरी गोळी झाडली. त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारा दरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे चांगले संबंध होते.

मोठी बातमी: भय्यूजी महाराजांची आत्महत्या

धर्मरक्षणासाठी, समाजहितासाठी भय्यूजींनी केला आर्थिक संकटाशी मुकाबला

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भय्यूजी महाराज यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली असून ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आध्यात्मिक गुरु श्री. भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजली’, असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे.

गडकरी यांच्यापाठोपाठ माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करत राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केले आणि श्रद्धांजली वाहिली.

शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. ‘संस्कृती, ज्ञान आणि निस्वार्थी सेवेचा संगम असणार एका मोठा व्यक्ती देशाने गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया शिवराज सिंह चौहान यांनी एएनआयकडे दिली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येवर ट्वीट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. ‘सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात अनेक लोकोपयोगी कार्य करणारे श्री भैयुजी महाराज यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे. वंचित आणि दुर्लक्षितांसाठी त्यांनी केलेले कार्य मोठे होते. आदिवासी आणि शेतकरी हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता’, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या