भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडेच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले…

ncp president sharad-pawar

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यायचा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, ते त्यासंबंधिचा निर्णय घेऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. तसेच तीनही पक्षांमध्ये समन्वय असून ते एकत्र निर्णय घेतात ही चांगली बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

‘आम्हाला असं वाटतं की भीमा कोरेगावबाबतील इथल्या गृहखात्याच्या पोलीस अधिकाऱ्याची वागणूक आक्षेपार्ह आहे. अशी तक्रार आमच्याकडे दलित समाजाकडून करण्यात आली आहे. आता ज्यांच्या वागणुकीवर आक्षेप आहे याच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीच्या निर्णयाची प्रक्रिया जेव्हा इथे सुरू झाली 9 ते 11 मध्ये इथे बैठक झाली आणि तीनच्या सुमारास केंद्र सरकारने हा तपास एनआयएनकडे घेतला. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे आणि असे असताना देखील आपला अधिकार त्यांनी काढून घेणं योग्य नाही’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

‘दिल्लीची बाब वेगळी आहे. महाराष्ट्रात आम्ही तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. दिल्लीतील परिस्थिती मात्र वेगळी आहे. दिल्लीकरांनी केजरीवालांना बहुमत दिलं. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीची लोकसंख्या एका राज्याएवढीही नाही. पण दिल्लीत देशभरातील लोक राहतात. त्यामुळे दिल्लीतील निकालांवरून देशातील ज्या ज्या भागातून, राज्यातून जनता येथे आलेली आहे त्या राज्यातील जनतेच्या मनात या परिवर्तनाला पाठिंबा आहे असं दिसतं. त्यामुळे दिल्लीचा निकाल हा भाजपविरोध जनमत आहे हे स्पष्ट करणारा आहे’, असं पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना चिमटा

दिल्लीतील आपच्या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आपला यश मिळाले अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी पवारांना प्रश्ना विचारला. त्यावर ‘ते घरोघर चिठ्ठ्या वाटतानाचे फोटो मला पाहायला मिळाले. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्याबद्दल आपण काय चर्चा करायची’, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा घेतला.

समान नागरी कायदा…

सध्या देशात समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावर विचारलं असता, ‘आता तरी समान नागरी कायद्याचा विषय नाही, उद्या येऊ शकतो’, असंही ते म्हणाले.

राज्यात सत्ताधारी तीनही पक्षात समन्वय

‘जे राज्य चालवतात त्या तीन पक्षाच्या समन्वय समितीमध्ये मी नाही. त्यांनी एकत्र बसून चर्चा केली, असे एकत्र येऊन निर्णय घेणं हे चांगलं आहे. असं सर्वांना दिसतं आहे. तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून कुणाला काय सूचना करायच्या, काय बोलायचे ते ठरवतात हे चांगलं आहे’, असं म्हणत त्यांनी तीनही पक्षाचं कौतुक केलं. ‘तुम्हाला काही खाद्य मिळेल अशी अवस्था नाही’, असं म्हणत पवारांनी मीडियालाही टोला लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या