‘मौनीबाबा’ मोदी संसदेत निवेदन द्या!

19

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राज्यसभेत विरोधकांनी या मुद्द्यावरून गोंधळ घातला. तर लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला. मोदी या घटनेवर गप्प का?, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

‘देशात कुठेही अशा अन्यायी घटना घडतात, तेव्हा मोदी एक शब्दही बोलत नाहीत,’ असा सणसणीत आरोप खरगे यांनी यावेळी केला.

आज लोकसभेत शून्य प्रहरात भीमा कोरेगाव हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ‘देशातील दलित समाज जागृत होत आहे. स्वाभिमानानं जगू पाहत आहे. मात्र, त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भीमा-कोरेगावमध्ये असच झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या हिंसाचारामागे आरएसएस व कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे,’ असा धडधडीत आरोप त्यांनी केला. तसेच जिथे भाजपची सत्ता आहे अशाच राज्यांमध्ये हे प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी कधीही त्यावर बोलत नाहीत. खरे तर त्यांनी संसदेत निवेदन द्यायला हवे. मोदी इतरांना ‘मौनीबाबा’ बोलतात, पण ते स्वत:च मौनीबाबा बनले आहेत,’ असा जोरदार टोला त्यांनी हाणला.

आपली प्रतिक्रिया द्या