संभाजी भिडे गुरूजींची पुन्हा हाफिज सईदशी तुलना

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘पाकिस्तानमध्ये सरकारतर्फे दहशतवादी हाफिज सईदला संरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे व हिंदू एकता संघटनेचे मिलिंद एकबोटे यांना राज्य सरकार संरक्षण देत आहेत’, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. याआधी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही आंबेडकर यांनी संभाजी भिडे गुरूजींची हाफिज सईदशी तुलना केली होती. भीमा-कोरेगाव येथील हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर मंगळवारी पहिल्यांदाच नागपुरात आले. ते नागपुरातील विविध सामाजिक संघटनांशी चर्चा करणार आहेत.

आंबेडकरांनी पत्रकारांशी बोलताना या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर अद्यापही कारवाई न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेले असताना पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही. भीमा- कोरेगावच्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी मान्य केली होती. याउपरही राज्य सरकारने अद्यापही चौकशी आयोग का नियुक्त केला नाही? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. यावरून राज्य सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होते’, असेही ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने पुढील काही काळात चौकशी आयोग नेमला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

‘पाकिस्तान सरकार हाफिज सईदला वेसण घालू शकत नाही. यामुळे पाकिस्तान संपूर्ण जगात वेगळा पडत आहे. अशीच स्थिती सध्या हिंदुस्थानमध्ये होत आहे. देशातील प्रत्येक राज्यात असे “हाफीज सईद” निर्माण झाले आहेत. आजपर्यंत हिंदू संघटनांनी दलित, मुसलमान व ख्रिश्‍चनांना लक्ष्य केले होते. आता हिंदूंमधील बहुजन वर्गाला लक्ष्य केले जात आहे. हिंदू विरुद्ध हिंदू असे लढ्याचे चित्र उभे झाले आहे. हे भीमा-कोरेगावच्या घटनेने स्पष्ट झाले आहे’, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

‘एल्गार परिषदेमध्ये कोणीही माओवादी नव्हते. या परिषदेचे निमंत्रण न्या. पी. बी. सावंत यांनी दिले होते. यात न्या. बी. जी. कोळसे पाटील व मी स्वतः होतो. आम्हा तिघांना कुणी माओवादी म्हणत असतील तर मग प्रश्‍न वेगळा आहे’, असेही आंबेडकरांनी म्हटले. तसेच उमर खालिदबद्दल बोलताना ते म्हणाले, उमर खालिदच्या विरोधात कोणताही देशद्रोहाचा गुन्हा नाही. जे आरोप त्याच्यावर होते त्यासर्व आरोपातून त्याची मुक्तता झाली आहे.