डॉ. भीमराव गस्ती

189

बेरडरामोशी समाजावर बसलेला जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी आणि घाणेरडय़ा अंधश्रद्धा व रुढींच्या जोखडातून देवदासींची मुक्तता करण्यासाठी डॉ. भीमराव गस्ती यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना समाजातील प्रतिष्ठत आणि प्रस्थापितांविरुद्ध प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रसंगी त्यांच्या जिवावरही बेतण्याची वेळ आली, पण सच्चा कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या डॉ. गस्ती यांनी कधी माघार घेतली नाही. वास्तविक डॉ. भीमराव गस्ती हे उच्चशिक्षित. इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्युत्तर पदवी आणि याच विषयात रशियन विद्यापीठाची डॉक्टरेट असे गस्ती यांचे शैक्षणिक कर्तृत्व. त्या जोरावर ते कुठल्याही मोठय़ा कंपनीत सुखवस्तू जीवन जगू शकले असते. कदाचित परदेशातही त्यांच्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली असती. मात्र त्याऐवजी त्यांनी बेरड समाजावरील होणारे अन्याय, अत्याचार आणि रुढी-अंधश्रद्धेच्या जोखडाखाली दडपले गेलेले देवदासींचे माणूसपण याविरोधातील ‘आवाज’ होण्याचा, त्यासाठी आयुष्य वेचण्याचा अवघड आणि खडतर मार्ग निवडला. बेळगावजवळील यमनापूर हे गस्तींचे मूळ गाव. एकदा गावातील रामोशी समाजातील काही तरुणांना दरोडय़ाच्या खोटय़ा गुन्हय़ात अडकवून प्रचंड मारहाण, जुलूम केल्याची घटना त्यांच्यासमोर घडली आणि गस्ती यांचे तरुण मन या समाजावरील ‘जन्मजात’ अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठले. बेरड आणि रामोशी समाजावर बसलेल्या गुन्हेगारीच्या जन्मजात शिक्क्याने ते अस्वस्थ झाले. पुढे ही अस्वस्थताच त्यांचे आयुष्य, त्यांचा जीवनमार्ग बनली. बेरड समाजाची उन्नती, त्यांचे प्रबोधन, त्यांच्यावरील जुलमी अत्याचाराविरोधात आवाज उठवणे, त्या समाजावरील जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी एका बाजूला संघर्ष आणि दुसऱया बाजूला त्या समाजात जागृती करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले. त्यासाठी त्यांनी मोर्चे काढले. आंदोलने, निदर्शने केली. बेरड समाजाच्या उन्नतीबरोबरच त्या भागातील देवदासींच्या प्रश्नालाही त्यांनी वाचा फोडली. त्यासाठी ‘उत्थान’ ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत देवदासी प्रथेविरुद्ध संघर्ष करतानाच देवदासींची त्यापासून मुक्तता करणे, त्यांना स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणे, शिक्षण, रोजगाराच्या सहाय्याने देवदासींना आत्मनिर्भर बनवणे असे बहुमोल कार्य डॉ. गस्ती यांनी केले. त्यांच्या या कामाचा विस्तार कर्नाटकसह महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातही झाला. देवदासी या अघोरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. स्वखर्चाने अनेक देवदासींचे विवाह लावून दिले. डॉ. गस्तींच्या प्रयत्नांमुळेच असंख्य देवदासींच्या मुली शिक्षण घेऊ शकल्या, ‘देवदासी’च्या जोखडात न अडकता स्वतंत्रपणे उभ्या राहू शकल्या. नोकरी करू शकल्या. या कार्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांचा हा लढा समाजातील ‘आहे रे’ वर्ग आणि प्रस्थापितांविरोधात असल्याने प्रसंगी त्यांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या असे प्रकारही झाले. मात्र गस्ती हे आपल्या कार्यापासून ढळले नाहीत. केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन, पोलीस अशा सर्वच पातळय़ांवर एका निरलसपणे ते हा संघर्ष करीत राहिले. पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘बेरड’ हे आत्मकथनही खूप गाजले. कारण त्यातील अनुभव सच्चे होते आणि ते त्यांनी अत्यंत निरागसपणे मांडले. एक निरलस, मितभाषी आणि प्रसिद्धीपराङ्मुख सच्चा कार्यकर्ता म्हणूनच ते वावरले. कदाचित त्यामुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सामाजिक समरसता मंच’ या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहिल्यामुळे डॉ. भीमराव गस्ती हे अन्य पुरोगामी समाज सुधारकांप्रमाणे ‘प्रसिद्धी’ मिळवू शकले नाहीत. अर्थात, ते त्यांचे उद्दिष्टच नव्हते. त्यामुळे त्याविषयी त्यांनी कधी खंतही व्यक्त केली नाही. त्यांच्या निधनाने भटक्या समाजासाठी, देवदासींच्या माणूसपणासाठी लढणारा निरलस आणि सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या