भिवंडीच्या काल्हेर-कशेळीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई, एमएमआरडीए अधिकाऱ्याला संतप्त जमावाची मारहाण

fight
file photo

भिवंडी तालुक्यातील कशेळी काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरवित कारवाई सुरू केली आहे. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना बेकायदा ठरवून कारवाई केली जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज एमएमआरडीए अधिकाऱ्याला मारहाण केली.

एमएमआरडीए क्षेत्र अंतर्गत भिवंडी तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. काल्हेर कशेळी या ग्रामपंचायत भागात एनए जमिनीवर निवास इमारतींचे बांधकाम झालेले आहे. यापैकी बहुतांश इमारती या एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरवले असून त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे 1 जून पासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या 24 तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यात आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. कारवाईची माहिती घेण्यासाठी शिवसेना आमदार शांताराम मोरे, उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे गावात आले असता ग्रामस्थांनी एमएमआरडीएचे अधिकारी आकसापोटी कारवाई करत असल्याचे गाऱ्हाणे ऐकवले. यावेळी संतप्त जमावाने प्रधान नावाच्या अधिकाऱ्याला चोप दिला. पोलिसांनी जमावाला शांत करून एमएमआरडीएने किमान आठ दिवस आधी नोटीस देऊन कारवाई करावी अशी सूचना केली. यानंतर जमाव शांत झाला.

मुद्रांक शुल्क कसे घेतले ?

दोनशेहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आली असून येथे तब्बल हजारो कुटुंब या कारवाईमुळे बेघर होणार आहेत. आम्ही मुद्रांक शुल्क भरून बँकेतून कर्ज घेऊन हे फ्लॅट खरेदी केले आहेत. त्यावेळी या अनधिकृत इमारती नव्हत्या का, असा सवाल उपस्थित करीत रहिवाशांनी तोड कामाला आक्षेप घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या