भिवंडीत शाळेच्या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचा घाट; विद्यार्थ्यांचे पालिकेसमोर आंदोलन

शाळेच्या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचा घाट भिवंडी पालिकेने घातला आहे. याला विरोध करण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी पालिकेवर धडक देऊन जोरदार आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी पालिकेविरोधात घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान का करता, असा सवाल पालकांनी विचारला आहे.

पद्मानगर या परिसरात तेलुगू भाषिक लोकसंख्या जास्त आहे. या ठिकाणी तेलुगू माध्यमाची शाळा क्र. ५९ ही गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू होती. मात्र शाळेची इमारत धोकादायक झाल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. या शाळेतील विद्यार्थी बाजूला असलेल्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र जमीनदोस्त केलेल्या शाळेच्या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचा पालिकेने घाट घातला आहे. पाण्याच्या टाकीविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी पालिकेवर धडक दिली. पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करून विद्यार्थांनी परिसर दणाणून सोडला.

स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही
विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन पालिकेने शाळेची इमारत तातडीने उभारावी अशी मागणी माजी शिक्षण मंडळ सभापती व अखिल पद्मशाली समाजाचे सरचिटणीस राजू गाजंगी यांनी केली आहे. या शाळेची इमारत बैठ्या खोल्यांची होती. त्या जागेवर इमारत उभी राहिल्यास मोकळ्या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत प्रशासन स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली.