रिक्षावाल्यांनी केले भिवंडी एसटी स्थानक ‘हायजॅक’, बेशिस्त चालकांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला भिवंडीकर मेटाकुटीला आले असताना आता याचा सामना एसटी चालकांनाही करावा लागत आहे. आपल्या मर्जीने एसटी स्थानकात कशाही रिक्षा उभ्या करून स्थानक परिसर रिक्षावाल्यांनी ‘हायजॅक’ केला आहे. त्यामुळे एसटीचालकांना बस स्थानकात ने-आण करताना अनेक अडचणी येत आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे.

भिवंडी बस स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या बस स्थानकात रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणाहून शिवाजी चौक, कल्याण रोड, धामणकर नाका, मंडई, नागाव, गायत्रीनगर आदी ठिकाणी जाणाऱ्या असंख्य रिक्षा बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या शोधासाठी घिरट्या घालत असतात. त्यामुळे बस स्थानकात बस घेऊन येणारे बसचालक आपला जीव मुठीत घेऊन बस चालवत असतात. कारण मागील चार वर्षांपूर्वी बसची रिक्षाला धडक लागल्याने बसचालकाला बेदम मारहाण झाली होती. यात बसचालकाचा मृत्यू झाला होता, परंतु त्यानंतरही भिवंडी पोलीस, ठाणे आरटीओ विभाग हे या बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करीत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या