पाण्याची बोंब, कचऱ्याचे ढीग, सुविधांची बोंब, भोईवाडा केईएम कर्मचारी वसाहतीत ‘गैरसोयींचा ताप’!

पाण्याची बोंब, ठिकठिकाणी दिसणारे कचऱयाचे ढीग आणि घराच्या भिंती-छतामधून वर्षभर झिरपणारे पाणी अशी दुरवस्था असताना घरभाडय़ाच्या नावाखाली महिन्याच्या पगारातून कापले जाणारे दहा ते अठरा हजार रुपये यामुळे पालिकेच्या केईएम रुग्णालय कर्मचाऱयांच्या भोईवाडा संक्रमण शिबिरातील कामगार कुटुंबीयांना अक्षरशः ताप झाला आहे. त्यामुळे पालिकेने याची तातडीने दखल घेत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिकेकडे केली आहे.

पालिकेच्या परळ येथील नावाजलेल्या केईएम रुग्णालयातील विविध खात्यांत काम करणारे 135 कामगार नायगाव-दादर येथील बीडीडी चाळ क्रमांक 5 ब, 8 ब आणि 22 ब या इमारतीत राहत होते. इमारत धोकादायक झाली असून त्यांची पुनर्बांधणी करायची असल्याने कामगारांना घरे रिकामी करायला सांगण्यात आले. मात्र दुसरा आसरा नसल्याने कामगारांनी घरे खाली करण्यास नकार दिला. म्हणून पालिका प्रशासनाने शेवटी पोलीस कुमक मागवून आपल्याच कामगारांना डिसेंबर-2021 मध्ये घराबाहेर काढले. यानंतर भोईवाडा स्मशानभूमीच्या मागे असलेल्या म्हाडा कॉलनीत त्यांना घरे देण्यात आली, मात्र या ठिकाणी सध्या सर्वच मूलभूत सुविधांची बोंब आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, चिटणीस संजय वाघ, माजी नगरसेविका ऊर्मिला पांचाळ यांनी केली आहे.

पोलिसांप्रमाणे मालकी हक्काची घरे द्या

100 वर्षांपूर्वीच्या नायगावच्या बीडीडी चाळीत पोलीस कर्मचारीही राहतात. त्यांच्या इमारती पुनर्बांधणीसाठी काढल्या गेल्या नाहीत. मात्र पालिका कामगार राहत असलेल्या इमारतीतील घरे रिकामी करायला लावली आहेत. पोलिसांना आता मालकी हक्काची घरे देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मग नायगाव येथील घरे पालिका कामगारांना का मिळू नये? असा सवाल युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केला आहे.