Akanksha Dubey प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, आजच प्रदर्शित झालेलं नवीन गाणं

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने वाराणसीमधील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सारनाथ पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.

आकांक्षा दुबे ही भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री होती. ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की-2’ या चित्रपटांमध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. विशेष म्हणजे आज 26 मार्च रोजीच भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह याच्यासोबतचे तिचे नवीन गाणे प्रदर्शित झाले होते. ‘ये आरा कभी हरा नहीं’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याचे बोल जावेद अख्तर आणि इमामुद्दीन यांचे असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे.

आकांक्षाच्या आत्महत्येनंतर काही तासांनी प्रदर्शित झालेल्या ‘ये आरा कभी हरा नहीं’ गाण्याला अवघ्या 5 तासात 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आकांक्षाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. मात्र आजच प्रदर्शित झालेल्या गाण्यात पाहत असणारी आपली आवडती अभिनेत्री या जगात नाही हे ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

येथे पहा ते गाणे

आकांक्षा दुबे तीन वर्षांची असताना आई-वडिलांसोबत मुंबईला आली होती. मुलीला आयपीएस अधिकारी बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु मायानगरीमध्ये आकांक्षाला चित्रपट क्षेत्र खुणावत होते. लहानपणापासून तिला डान्स आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. याच क्षेत्रात काम करायचे हे ध्येय ठेवलेल्या आकांक्षाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. पुष्पांजली पांडे या मैत्रिणीने आपल्याला सुरुवातीच्या काळात खुप मदत केल्याचे तिने मागे सांगितले होते.

17 वर्षांची असताना तिने भोजपुरी चित्रपटात पाऊल ठेवले. दिग्दर्शक आशी तिवारी यांच्या काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र यानंतर तिला अनेक ठिकाणी नकार मिळाला. त्यामुळे 2018मध्ये तिला नैराश्याने ग्रासले होते. यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. मात्र या दरम्यान तिच्या आईने तिची समजूत काढल्याने तिने पुन्हा कमबॅक केले. चित्रपटांसह तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले.