पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची…! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच ठार

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या आन्वापाडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्याचे सोमवारी (ता.22) दुपारी अपघाती निधन झाले. विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी निवडणूकी नंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पहिल्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यांनतर विवाह सोहळ्यासाठी त्या पतीसह दुचाकीने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

त्यामुळे त्यांची सोमवारची पहिली बैठक शेवटची ठरल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिता गणेश सोनवणे (32) असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यात महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या आहे. त्यात तालुक्यातील आन्वापाडा ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाली.

या निवडणुकीत येथे सध्या सत्ताधारी असलेल्या पॅनलच्या विरोधात येथील अनिता गणेश सोनवणे या एकमेव महिला सदस्य विरोधी पॅनल कडून विजयी झाल्या होत्या.

निवडणुकीनंतर सोमवारी ग्रामपंचायतीची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. बैठक संपल्यानंतर पती गणेश सोनवणे यांच्यासह त्या बुलढाणा जिल्ह्यातील साखळी येथे एका विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात असताना माळवंडी गावाजवळ झालेल्या अपघातात अनिता सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गणेश सोनवणे जखमी झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या