भूलभुलैय्याच्या सिक्वलमध्येही दिसणार ‘हा’ अभिनेता!

1041

बॉलिवूडच्या आजवरच्या सर्वाधिक गाजलेल्या विनोदी चित्रपटांपैकी एक म्हणजे भूलभुलैय्या. एका राजघराण्यातल्या घटनेवर आधारित हा चित्रपट 2007मध्ये प्रदर्शित झाला होता. रहस्यपटाला दिलेल्या विनोदाच्या चुरचुरीत फोडणीमुळे भूलभुलैय्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा सिक्वलही येऊ घातला आहे. या सिक्वलमध्ये आधीच्या भूलभुलैय्यामधला एक कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

13 वर्षांपूर्वी भुलभुलैय्या नावाचा विनोदाची झालर असलेला एक धमाल रहस्यपट प्रदर्शित झाला होता. एका राजवाड्यातल्या एक गूढ बंद दरवाजा, त्याचं रहस्य आणि त्याची उकल अशी त्याची कथा होती. अक्षय कुमार, शायनी आहुजा, विद्या बालन, अमिषा पटेल, परेश रावल यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भूलभुलैय्या या चित्रपटातलं एक धमाल पात्र होतं नटवर उर्फ छोटा पंडित. ही खरंतर चित्रपटातली एक छोटी व्यक्तिरेखा होती. पण, या व्यक्तिरेखेच्या धाटणीमुळे आणि धमाल संवाद-प्रसंगामुळे प्रेक्षकांच्या ती चांगलीच लक्षात राहिली होती. ही भूमिका साकारणारा अभिनेता राजपाल यादव भूलभुलैय्याच्या सिक्वलमध्येही दिसणार आहे.

rajpal-yadav-bhoolbhulaiya

या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनिस बझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची निर्मिती असणार आहे. ‘भूल भुलैय्या 2’ मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेता कियारा आडवाणी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना अनिस बज्मी म्हणाले की, हा चित्रपट भूलभुलैय्याचा दुसरा भाग असला तरी कथेत कोणतेही साम्य असणार नाही. याची कथा मानसिक आजाराच्या विषयावर नसून हा एक हॉरर ड्रामा असणार आहे. तसेच ‘भूलभुलैय्या 2’ ची कथा तिथूनच सुरू होईल जिथे पहिल्या कथेचा शेवट झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या