भयानक! मासिक पाळी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले

1348

गुजरातच्या एका महाविद्यालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासिक पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालयातील प्रशासनाने मुलींचे कपडे उतरवले आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन होते असा कॉलेज प्रशासनाचा दावा होता. त्यामुळे त्यांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवून मासिक पाळी सुरू आहे की नाही हे तपासले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

अहमदाबाद मिररने याबाबत वृत्त दिले आहे. गुजरातच्या भूजमध्ये एक संस्था चालवली जाते. 2012 साली कॉलेजची सुरुवात झाली, 2014 मध्ये ही संस्था नव्या वास्तूत स्थिर झाली. या महाविद्यालयात बी. कॉम, बीए आणि बीएससीचे पद्वी अभ्यासक्रम शिकवले जातात. प्रशासनाच्या नियमांनुसार जेव्हा मुलींची मासिक पाळी सुरू असते तेव्हा त्यांना कॉलेजमधील धार्मिकस्थळ आणि हॉस्टेलच्या स्वयंपाकगृहातही बंदी असते. अशा वेळी त्या विद्यार्थिनींनी कुठल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला स्पर्शही करायचा नाही असेही नियमात म्हटले आहे.

गुरुवारी हॉस्टेलच्या रेक्टर अंजलीबेन यांनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. सर्व मुलींना वर्गातून बाहेर काढण्यात आले आणि कुणाची मासिक पाळी सुरू आहे असे विचारण्यात आले. त्यापैकी 2 मुलींनी हात वर केले. त्यांना बाजूला काढण्यात आले. नंतर 68 मुलींना कॉलेजच्या शौचालयात नेण्यात आले आणि त्यांचे कपडे काढून खातरजमा करण्यात आली की त्यांची मासिक पाळी सुरू आहे की नाही.

कॉलेज प्रशासनाला वाटले की मुलींकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकवेळा प्रशासनाकडून विद्यर्थिनींना या प्रकरणी हटकले जाते. परंतु गुरुवारी कहरच झाला. त्यामुळे 68 मुलींनी आंदोलन केले आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली.

परंतु कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत कुठलीच तक्रार दाखल झालेली नाही. मात्र याबाबत चौकशी समिती नेमण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या