‘मरे’च्या भुसावळ विभागाची नोव्हेंबरमध्ये तिकीट विक्रीतून दणदणीत कमाई; रक्कम ऐकून थक्क व्हाल!

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नोव्हेंबरमध्ये तिकिटांच्या विक्रीतून 67 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत विभागाला 50 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

‘या वर्षी, तिकीट विक्री व्यवसायात सुमारे 33% सुधारणा झाली आहे. कोरोना काळामुळे झालेली घट आता सुधारली असून अधिकाधिक लोक प्रवासासाठी पु्न्हा एकदा रेल्वेकडे परत येऊ लागले आहेत’, अशी माहिती भुसावळ रेल्वे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सुमारे 7% वाढीसह, विभागाला नोव्हेंबरमध्ये माल वाहतुकीतून 58 कोटी रुपयांची कमाई झाली, जी गेल्या वर्षी जमा झालेल्या 54 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. दरम्यान, विभागाला नॉन-फेअर महसूल विभागात सर्वाधिक महसूल मिळाला आहे, ज्यामध्ये प्रसिद्धी, खानपान सेवा, पार्किंग इत्यादींचा समावेश आहे. देऊ केलेल्या सेवा एकतर कराराच्या आधारावर आहेत, किंवा रेल्वे कोणतीही गुंतवणूक करत नाही, ती फक्त व्यावसायिक कामांसाठी जागा प्रदान करते आणि त्यातून महसूल प्राप्त होतो.