धाडसी कारवाई करणाऱ्या एटीएसला ठेंगा, तपास करणाऱ्या पोलिसांना बक्षीस

20

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जिवाची पर्वा न करता एटीएसने अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने ठेंगा दाखवत तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. महासंचालक कार्यालयाच्या या दुजाभावामुळे एटीएस अधिकाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

हिमायतबाग येथे १६ मार्च २०१२ मध्ये मध्य प्रदेशातील सिमीचे मोहंमद अबरार, अखिल खिलजी, खलील खिलजी या अतिरेक्यासोबत एटीएसचे नवीनचंद्र्र रेड्डी, शिवा ठाकरे या अधिकाऱ्यांची चकमक झाली होती. यात एक अतिरेकी ठार झाला होता तर एटीएस कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणी एटीएस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा रामेश्वर थोरात आणि अनिरुद्ध नांदेडकर यांच्या पथकाने सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. याआधारे न्यायालयाने पकडलेल्या अतिरेक्यांना शिक्षा ठोठावली होती. उत्कृष्ट तपास केल्याने पोलीस महासंचालकांनी तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, जिवाची बाजी लावून अतिरेक्यांसोबत चकमक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठेंगा दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या