विराटला अव्वल मानल्याबद्दल आभार, ‘बिग बीं’चा ऑस्ट्रेलियन मीडियाला टोला

68

सामना ऑनलाईन ।  मुंबई

ऑस्ट्रेलियन मीडियाने हिंदुस्थानी कर्णधार विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प असे संबोधून त्याला अव्वल आणि विजेताच ठरवलेय. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा खोचक शब्दांत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विराटला समर्थन देत ऑस्ट्रेलियन प्रसिद्धीमाध्यमांच्या तुसडेपणाचा समाचार घेतला आहे.

विराटने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर टीका केल्यानंतर खवळलेल्या ‘कांगारूं’च्या प्रसिद्धीमाध्यमांनी विराटवर टीकेचा भडिमार केला होता. ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील लेखात विराट ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूबद्दल चुकीच्या बातम्या पसरवतोय. तो क्रीडा विश्वातला ‘वादग्रस्त’ डोनाल्ड ट्रम्पच आहे. कारण तो प्रत्येक गोष्टीसाठी मीडियाला जबाबदार धरतोय, अशी बोचरी टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर ‘बिग बी’ अमिताभ बच्चनही विराटच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. विराटला ट्रम्प यांची उपमा देऊन ऑस्टेलियन मीडियाने त्याला क्रिकेट क्षेत्रात अव्वल ठरवलेय याबद्दल या मीडियाचे आभारच मानायला हवेत, असा खोचक टोला ‘बिग बीं’नी ट्विटरवरील संदेशात लगावला.

ऑस्ट्रेलियन मीडिया हाकांगारूच्या संघाचा सपोर्ट स्टाफच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या खेळाडूंवर टीका केली तर त्याकडे लक्ष देण्याची मुळीच गरज नाही.

सुनील गावसकर, माजी हिंदुस्थानी कर्णधार

 

आपली प्रतिक्रिया द्या