रियालिटी शो स्पर्धकावरील बलात्काराचं लाईव्ह टेलिकास्ट, टीव्ही चॅनलचा प्रताप

4884

टीव्हीवर दाखवले जाणारे रियालिटी शो आणि त्यातलं नाट्य हे बऱ्याचदा वादाचे विषय ठरतात. कारण, या शोच्या प्रेक्षकांना आवडणारा कन्टेट देता देता कधीकधी असे शो आपली पातळी सोडतात आणि वाद ओढवून घेतात. अशाच प्रकारे एका रियालिटी शोने स्पर्धकावर झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ लाईव्ह दाखवल्याने गदारोळ माजला आहे.

हिंदी किंवा मराठीत दाखवला जाणारा बिग बॉस हा टीव्ही शो ज्या शोपासून प्रेरित आहे, त्या बिग ब्रदर या शोमध्ये हा प्रकार घडला आहे. स्पेनमध्ये झालेल्या बिग ब्रदर या शोमध्ये एका स्पर्धकाला तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ दाखवला गेला आहे. शार्लोट प्राडो असं या स्पर्धकाचं नाव आहे. ती 2017मध्ये तिचा बॉयफ्रेंड जोस मारिया लोपेझ याच्यासह बिग ब्रदरमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये एका रात्री दारूची पार्टी ठेवण्यात आली होती. त्या पार्टीनंतर शार्लोटवर तिचा बॉयफ्रेंड जोस यानेच बलात्कार केला होता. नशेत धुंद असूनही शार्लोटने त्याला प्रतिकार केला होता. हा सर्व प्रकार बिग ब्रदरच्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाला होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी शार्लोटला तो व्हिडीओ दाखवण्यात आला. तो दाखवत असतानाचं लाईव्ह टेलिकास्टही करण्यात आलं. शार्लोटने हा व्हिडीओ थांबवण्याची विनंतीही निर्मात्यांना केली. मात्र, त्यांनी तिचं काहीही ऐकलं नाही. फक्त तिच्या बॉयफ्रेंडची या शोमधून हकालपट्टी करण्यात आली. बिग ब्रदर स्पेनच्या या भागाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला, तेव्हा हा भयंकर प्रकार उघड झाला. तिच्या बॉयफ्रेंडने असं काही केल्याचा साफ इन्कार केला असून गेल्या दोन वर्षांपासून शार्लोट मानसोपचार घेत आहे. या शोनंतर निर्मात्यांनी तिला भेटण्याचा किंवा तिची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच या व्हिडीओनंतर अनेक प्रायोजकांनीही या टीव्ही शोला जाहिराती देण्यास नकार दिला, अशी माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या