रुग्णाशी सहमतीनेही शरीरसंबंध ठेवता येणार नाही; मेडिकल काऊन्सिलचा मोठा निर्णय

सामना ऑनलाईन । नागपूर

रुग्णालयात होणारे लैंगिक दुर्व्यवहाराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. देशातील कोणत्याही रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरला आता रुग्णाशी सहमतीनेही शरीरसंबंध ठेवता येणार नाही. त्याचबरोबर रुग्णाने पुढाकार घेतला असला तरी डॉक्टरला असे करता येणार नाही, असा निर्णय एमसीआय घेतला आहे.

रुग्णालयांमध्ये होणाऱ्या लैंगिक गैरप्रकारांबाबत मेडिकल काऊन्सिलचे काय निर्देश आहेत, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतरच एमसीआयने निर्णय घेऊन नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. एमसीआयशी संबंधित असलेल्या एका हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरने अमेरिकेत केलेल्या गैरप्रकारानंतर उच्च न्यायालयाने एमसीआयकडे विचारणा केली होती. त्यानंतर एमसीआयला या प्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.

चांगले बदल होतील!

एमसीआयने घेतलेला निर्णय हा निश्चित चांगला असून त्याचे चांगले परिणाम दिसतील. वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल, असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे तर ही तत्त्वे म्हणजे डॉक्टरांसाठी आचारसंहिताच असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 डॉक्टरने रुग्णासोबत कसे वागायला हवे याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे एमसीआयने याआधीच निश्चित केली आहेत. कोर्टाच्या म्हणण्यानुसार या मार्गदर्शक तत्त्वांविषयी केवळ नव्याने सूचना काढण्यात आली. ज्याप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते पवित्र असायला हवे त्याप्रमाणेच डॉक्टर आणि रुग्णाचेही आहे. डॉक्टरकडे येणारा रुग्ण हा त्रासलेला असतो. तो समस्यांनी ग्रासलेला असतो. त्यामुळे त्याच्या समस्येचा फायदा घेऊन डॉक्टरने कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवणे हे गैरच आहे.

डॉ. शिवकुमार उत्तुरे, एमसीआय

आपल्या समाजात डॉक्टरला देव म्हणून मानले जाते. हे संबंध पवित्रच राहायला हवेत. याबाबत कोणतेही दुमत नाही. डॉक्टरने आपली प्रतिमा कायम सांभाळायला हवी. कारण त्याचा परिणाम समाजावर होणार आहे. त्यामुळे रुग्णासोबत असलेल्या संबंधांचा गैरवापर केला गेल्यास त्यावर कारवाई व्हायलाच हवी.

डॉ. अनिल कुमार, हृदयविकारतज्ञ