हाँगकाँग पहिल्या तर दुबई चौथ्या स्थानावर, टोलेजंग इमारतींच्या यादीत मुंबईचा समावेश

सध्याच्या काळात चीनचे रिअल इस्टेट सेक्टर आर्थिक संकटात आहे. असे असले तरी एकेकाळी रिअल इस्टेट सेक्टर हाच चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. अत्युच्च इमारती उभारण्याबाबत चीनला कुणी मागे टाकू शकत नाही. चीनचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. जगभरातील 150 मीटरपेक्षा उंच इमारती असलेल्या शहरांमध्ये चीनचा दबदबा आहे. अशा टॉप 10 शहरांमध्ये चीनमधील सहा शहरे आहेत. चीनमध्ये 300 मीटर उंच अशा 57 इमारती आहेत. हिंदुस्थानात 300 मीटरपेक्षा उंच अशी एकच इमारत आहे.

– उंच इमारतींच्या देशांच्या यादीत न्यूयॉर्क तिसऱ्या नंबरवर आहे. न्यूयॉर्पमध्ये 318 उंच इमारती आहेत. चौथ्या क्रमांकावर दुबई शहर आहे. दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत 828 मीटर उंच आहे. मुंबई शहर या यादीत 15 व्या स्थानावर आहे. मुंबईत 101 इमारतींची उंची 150 मीटरहून अधिक आहे. टॉप 100 शहरांच्या यादीत हिंदुस्थानातील मुंबई हे एकमेव शहर आहे.

– चीनचा हिस्सा असलेला हाँगकाँग उत्तुंग इमारतीसाठी पहिल्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगमध्ये अशा 558 इमारती आहेत, ज्यांची उंची 150 मीटरहून अधिक आहे. 1980 च्या आधी या शहरात अशा फक्त दोन इमारती होत्या. चीनच्या शेनजेन शहरात 414 इमारती असून या यादीत ते दुसऱया क्रमांकावर आहे.