…म्हणून फॉर्मात असूनही पृथ्वी शॉची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही, अखेर कारण झालं स्पष्ट

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली. या संघात मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉ याची निवड झाली नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमच्या 14 व्या हंगामात धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वीची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झाल्याने सर्वच अचंबित झाले होते. शानदार फॉर्मात असतानाही त्याला संघात स्थान न मिळू शकल्याने अनेकांनी सवाल उपस्थित केला होता. अखेर यामागील कारण आता स्पष्ट झाले आहे.

बीसीसीआयशी संबंधीत एका सूत्राने पृथ्वी शॉ याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड का झाली नाही याचे कारण स्पष्ट केले आहे. याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. ‘टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉ याला आपल्या फिटनेसवर काम करावे लागेल. पृथ्वी शॉ याला आपले वजन कमी करावे लागेल’, असे बीसीसीआयच्या सूत्राने म्हटले.

ऑस्ट्रेलियामध्ये क्षेत्ररक्षण करताना पृथ्वी शॉ याची मैदानावरील एकाग्रता कमी होती. पृथ्वी शॉ याच्यासमोर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे चांगले उदाहरण आहे. वाढत्या वजनामुळे पंत यालाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. परंतु त्याने स्वत:वर काम केले आणि संघामध्ये झोकात पुनरागमन केले, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले.

पृथ्वी शॉ हा फक्त 21 वर्षांचा आहे, मात्र या तरुण वयातही त्याच्या मैदानावरील हालचाली मंद आहेत. त्यामुळे त्याला वजन घटवण्याची आवश्यकता असून फिटनेवर काम करावे लागेल, असे बीसीसीआयच्या सूत्राने म्हटले. तसेच पृथ्वी शॉ याला आगामी काही स्पर्धांमध्येही आपला फॉर्म दाखवावा लागेल. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर नेहमीच त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो संघर्ष करताना दिसून आला. तो एक उत्तम खेळाडू असल्याने जास्त काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले.

जबरदस्त फॉर्म

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये फ्लॉप गेल्यानंतर पृथ्वी शॉ याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या. पृथ्वीने 827 धावा चोपत मुंबईला चॅम्पियन बनवले. तसेच आयपीएलमध्येही त्याने 8 लढतीत 38.50 च्या सरासरीने 308 धावा केल्या. यात त्याने 3 अर्धशतकीय खेळी केल्या. यंदाच्या हंगामात मुंबईचा खेळाडू किरोन पोलार्डनंतर सर्वात कमी चेंडूत अर्धशतकही पृथ्वी शॉ याने ठोकले.

आपली प्रतिक्रिया द्या