बिहारमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

520

चीनमध्ये 80बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसची दहशत आता अनेक देशात पसरत आहे. मुंबईत कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर आता बिहार येथील छपरा भागात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे.

बिहारमधील एक तरुणी नुकतीच चीनहून परत आली आहे. चीनमधून परतल्यानंतर तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांसारखीच लक्षणे दिसत होती. त्यामुळे तिला छपरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ‘कोरोना’ संशयितांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळत आहेत. शिवाय श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास जाणवतो. या तरुणीला होणाऱ्या त्रासामध्ये आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साधर्म्य आढळल्यामुळे तिला लागण झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून तिला आता पाटण्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षकांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. हा आजार 2003 मध्ये पसरलेल्या सीव्हिअर अॅक्यूट रेसिपिरेट्री सिंड्रोम म्हणजे सार्स सारखाच धोकादायक असल्याचे मानले जाते. चीन व्यतिरिक्त कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवानमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाची दहशत पसरल्यामुळे आता हिंदुस्थानातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या