गावातील महिलांचे कपडे धुण्याची शिक्षा…महिलांची छेड काढणाऱ्याला न्यायालयाचा आदेश…

बिहारच्या मधुबनीमध्ये एका आरोपीला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेची सर्वत्र चर्चा होत आहे. महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या आरोपीला न्यायालयाने विचित्र शिक्षा सुनावली आहे. आरोपी व्यवसायाने धोबी असल्याने त्याने पुढील सहा महिने गावातील महिलांचे कपडे मोफत धुवावे आणि त्या कपड्यांना इस्त्री करून द्यावी, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे.

झंझारपूर न्यायालयातील न्यायाधीश अविनाश कुमार प्रथम यांनी आरोपीला ही विचित्र शिक्षा सुनावली आहे. ललन कुमार साफी ( वय 20) याला महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण प्रथम यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी गावातील महिलांचे कपडे मोफत धुवून त्यांना इस्त्री करून देण्याच्या अटीवर ललन कुमारला जामीन मंजूर केला.

17 एप्रिलला एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप ललन कुमारवर आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर त्याला 19 एप्रिलला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. आपल्या अशीलाला त्याच्या व्यवसायातून समाजसेवा करण्याची इच्छा असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे त्याची समाजसेवेची इच्छा लक्षात घेता त्याला जमीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यावर अविनाश कुमार प्रथम यांनी हा निकाल दिला आहे.

आरोपी व्यवसायाने धोबी आहे. त्याला व्यवसायातून समाजसेवा करायची आहे. त्यामुळे त्याने पुढील सहा महिने गावातील महिलांचे कपडे मोफत धुवावेत आणि त्यांना इस्त्री करून द्यावी. या प्रमाणे त्याने समाजसेवा करावी. यातून महिलांशी गैरवर्तन केल्याचा त्याला पश्चात्ताप होईल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच त्याला जामीन देताना 10 हजाराचा जामीनदार देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याने काम केल्यास सहा महिन्यांनी सरपंच किंवा सरकारी अधिकारी त्याला मोफत सेवेचे प्रमाणपत्रही देणार आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपी मोफत सेवा देत आहे किंवा नाही, यावर सरपंच आणि गावचे प्रमुख लक्ष ठेवणार आहेत.

न्यायाधीश अविनाश कुमार त्यांच्या अनोख्या निकालासाठी ओळखले जातात. आरोपीला पश्चात्ताप होईल आणि तो पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही, अशी शिक्षा सुनावण्यावर त्यांचा भर असतो. कोरोना काळात शाळा सुरू करणाऱ्या शिक्षकाला त्यांनी पहिली ते पाचवीपर्यंतच्या 5 गरीब मुलांना तीन महिने मोफत शिक्षण देण्याच्या अटीवर जामीन दिला होता. तसेच मारहाण प्रकरणातील एका आरोपीला परिसराची नियमित साफसफाई करण्याच्या अटीवर त्यांनी जामीन दिला होता.

एक महिना मंदिराच्या निर्माण कार्यात मजुरी करण्याच्या अटीवर त्यांनी एका मजूराला जामीन दिला होता. तर पूरग्रस्तांना अन्नधान्य पुरवण्याच्या अटीवर त्यांनी दोन आरोपींना जामीन दिला होता. सुनावलेल्या शिक्षेने आरोपी कोडगा होणार नाही, त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन तो पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही, अशी शिक्षा देण्यावर अविनाश कुमार यांचा भर असतो.

आपली प्रतिक्रिया द्या